नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे संचालित श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरची सोमवारी (ता. ४) माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. असीम गुप्ता आणि महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रबंध संचालक श्रीमती जयश्री भोज यांनी पाहणी केली. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस. उपस्थित होते.
याप्रसंगी मनपा आयुक्तांनी श्री. असीम गुप्ता यांचे तर श्रीमती भुवनेश्वरी एस. यांनी श्रीमती जयश्री भोज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पाहणीदरम्यान श्री. असीम गुप्ता यांनी सिटी ऑपेरेशन सेंटर तर्फे नागपूर शहरात लावण्यात आलेले ३६०० कॅमेरे, सार्वजनिक घोषणा तसेच इतर व्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती घेतली. ई गव्हर्नन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले यांनी ऑपेरेशन सेंटरमार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारांना लवकर पकडण्यासाठी व शहरात अपघात झाला असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीस विभागाला मिळते. सोबतच ट्राफिक पोलीस कर्मचारी या केंद्रामधूनच वाहनांवर नजर ठेवतात. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ऑनलाईन चालान सुद्धा करतात. याव्यतिरिक्त वाहतुकीचे नियम, स्वच्छता किंवा कोणत्याही सार्वजनिक सूचना/जनजागृती करण्यासाठी चौकाचौकात स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून शहरात प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. शील घुले यांनी यावेळी दिली.
सिटी ऑपरेशन केंद्र तांत्रिकदृष्टया आणखी कसे अद्ययावत करता येईल याविषयी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. असीम गुप्ता आणि महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रबंध संचालक श्रीमती जयश्री भोज यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, इंफ्रा व मोबिलिटी विभागाचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, ई गव्हर्नन्स विभागाचे अनुप लाहोटी, कुणाल गजभिये, अपूर्वा फडणवीस इत्यादी उपस्थित होते.