३ दिवसीय दौऱ्यादरम्यान विविध विषयांवर केली चर्चा
नागपूर : एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) ४ सदस्यीय शिष्ट मंडळाने महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा तीन दिवसीय दौरा केला. सदर दौऱ्यात एडीबीचे श्री. मुकुंद सिन्हा, श्री. शरद सक्सेना, श्री. कौशल शाहू आणि श्री.मिहीर सोरती या चार अधिकाऱ्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी चर्चा करत मेट्रो रेल प्रकल्पाची तसेच नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – २ ची देखील सविस्तर माहिती जाणून घेतली. महा मेट्रोच्या वतीने या शिष्टमंडळाना प्रकल्पाचे प्रस्तुतीकरण देण्यात आले. एशियन डेव्हलपमेंट बँक ही आशिया युनियनचे सभासद असलेल्या विविध देशांच्या अखत्यारीत आहे. पत पुरवठा करणाऱ्या मोठ्या जागतिक बँकांमध्ये या बँकेची गणना होते.
या शिष्ट मंडळाने हिंगणा डेपो,लोकमान्य नगर, सिताबर्डी इंटरचेंज, खापरी मेट्रो, झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन पाहणी केली. मेट्रो स्टेशन येथील तिकीट काउंटर, डिजिटल तिकीट, पार्किंग परिसर, मल्टी मॉडेल इंटिग्रेशन, फीडर सेवा, अग्निशमन उपकरणे, एअर कंडिशनिंग, चार्जिंग सेंटर, बायो डायजेस्टर, वॉटर रिसायकलिंग प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग संसाधनांची माहिती जाणून घेतली. महा मेट्रोद्वारे मेट्रो स्थानक आणि परिसरात उपलब्ध व्यावसायिक क्षेत्र मालमत्ता विकास इत्यादींची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली.
स्थानकांची आणि एकूणच कामकाजाची पाहणी सोबतच या पथकाने मेट्रो भवनच्या नियंत्रण कक्षाला देखील भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षासंबंधी सविस्तर माहिती या अधिकाऱ्यांना दिली. महा मेट्रोतर्फे करण्यात येत असलेल्या विविध कामांची माहिती एडीबी चमूला देण्यात आली. यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथूर, संचालक (स्टेटर्जिक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटे, संचालक (वित्त) श्री. हरिंदर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.