Published On : Fri, Jul 12th, 2019

धूरमुक्त- गॅसयुक्त संकल्पनेंतर्गत 1 लाख 10 हजार कुटुंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी- अश्विन मुदगल

नागपूर: ‘धूरमुक्त- गॅसयुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम येत्या 14 जुलैपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. बीपीएल, अंत्योदय या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतच केरोसीनचा वापर करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरातील सर्व कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. या अभियांनातर्गत जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 10 हजार कुटुंबांना थेट लाभ होणार असून ही मोहीम 15 ऑगस्टपर्यंत राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

बचत भवन सभागृहात ‘धूरमुक्त- गॅसयुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग, जिल्ह्यातील गॅस एजन्सीचे मालक, व्यवस्थापक तसेच एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल या कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धूरमुक्त- गॅसयुक्त ही संकल्पना प्रभावीपणे व मिशनमोडवर राबवायची असल्यामुळे ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही. अशा सर्व कुटुंबांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्याची सूचना करताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, ग्रामीण भागात 45 हजार कुटुंब व शहर भागात 56 हजार कुटुंब केरोसीनचा वापर करतात. या सर्व कुटुंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. यासाठी गॅस एजन्सी व अन्नधान्य वितरण विभागातर्फे गॅस कनेक्शन मिळण्यासाठी अशा कुटुंबांकडे विहित नमुन्यात अर्ज भरुन येत्या सात दिवसांत संबंधित कुटुंबांना गॅस योजनेचा लाभ मिळेल यादृष्टीने गॅस एजन्सीच्या मालकाने नियोजन करावे, असे निर्देशनही यावेळी दिले.

गॅस जोडणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गॅस एजन्सींनी ग्राहकांना फॉर्म उपलब्ध करुन देण्यासोबतच केवायसी तसेच उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक असलेल्या रेशनकार्डसह आवश्यक माहिती असलेल्या फॉर्मवर तात्काळ निर्णय घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही व गॅस कनेक्शन सुद्धा नाही अशा लाभधारकांकडून सुद्धा गॅस जोडणीसाठी फॉर्म भरुन घ्यावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

अन्नसुरक्षा योजनेचा जिल्ह्यातील 24 लाख लोकांना लाभ ‍मिळत असून यांतर्गत 1 लक्ष 13 हजार अंत्योदय व अन्य योजनांची कार्डधारक आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान याच कालावधीत राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत 100 टक्के पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे आणि ‘धूरमुक्त-गॅसयुक्त महाराष्ट्र’ यांतर्गत सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन देणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेले कुटुंब, गॅस नसलेले कुटुंब तसेच धान्य मिळत नसलेले कुटुंब यांची यादी तयार करण्यात येत असून अशा कुटुंबांना या मोहिमेत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. अन्नधान्य विभाग व संबंधित गॅस एजन्सीमार्फत विशेष शिबिर घेण्यात येईल.

प्रारंभी पुरवठा विभागाचे उपायुक्त रमेश आडे यांनी या योजनेबद्दल माहिती देवून ‘धूरमुक्त-गॅसयुक्त महराष्ट्र’ मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भात माहिती दिली. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर, अनिल सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे तसेच विविध गॅस कंपनीचे अधिकारी, वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement