Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 11th, 2017

  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाला खरे अच्छे दिन येणारः खा.अशोक चव्हाण

  नागपूर: काँग्रेस पक्षाच्या 132 वर्षाच्या इतिहासात प्रत्येक काँग्रेस अध्यक्षांनी केवळ पक्षहिता करिताच नाही तर देशहितासाठी भरीव योगदान दिले असून प्रत्येकाचे जीवन देशासाठी समर्पित राहिले आहे. या परंपरेतील अनेकांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासीक व गौरवशाली पंरपरेला साजेसे नेतृत्व राहुल गांधी यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाने देशाला दिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला खरे अच्छे दिन प्राप्त होतील असा ठाम विश्वास राहुल गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

  या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांकरिता आजचा दिवस ऐतिहासीक आणि आनंदाचा आहे. काँग्रेस पक्ष गेली 132 वर्ष अनेक चढ उतारांना सामोरे जात, विविध आव्हानांना तोंड देत, देशातील अनेक पिढ्यांचे नेतृत्व करित आला आहे. देशाची महान संस्कृती आणि परंपरा जपताना सामाजिक आणि जागतिक बदलांचे केवळ प्रतिरूप न राहता समाजामध्ये बदल घडवून आणणे आणि देशाला जागतिक आव्हानांना तोंड देण्याकरिता सिध्द करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने वेळोवेळी समर्थपणे बजावली आहे. देशाची सर्वांगीण प्रगती साधत देश घडवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने केले आहे याचा काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान आहे. या महान पंरपरेला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व राहुल गांधी यांचे असून देशाला ‘प्रामाणिक’ नेता मिळाला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

  सद्यस्थितीत राजसत्तेवर जनतेची दिशाभूल करणारे, धादांत खोटे बोलणारे नेतृत्व आहे. सदर नेतृत्वाखाली देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडण धोक्यात आली असून देशाचा नैतिक पाया ढासळत चालला आहे. सत्तेकरिता स्वप्ने विकणे, खोटी आश्वासने देणे हे प्रकार सर्रास सुरु असून देशातील सर्वोच्च पदाचा आब देखील दुर्देवाने राखला जात नाही. भविष्यात येणा-या पिढ्या कोणता आदर्श घेणार? देशातील अनेक महान नेत्यांनी प्रचंड परिश्रमाने टिकवलेली या देशातील लोकशाही आणि सामाजिक एकतेची मूल्ये अबाधित कशी राहतील? देशात जातीय सलोखा टिकेल की नाही? असे अनेक प्रश्न या कालावधीमध्ये देशापुढे आव्हान म्हणून उभे राहिले आहेत. राहुल गांधी यांच्या रूपाने या आव्हानांना सक्षमपणे तोंड देणारे सर्व जाती, धर्म आणि समाजील सर्व घटकांना बरोबर घेऊन नेहमीच जन की बात करणारे नेतृत्व मिळाले आहे.

  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही, सामाजिक मूल्ये अधिकाधिक मजबूत होतील आणि देशाच्या सामाजिक एकतेवर घाला घालणा-या विचारधारेचा बिमोड करण्याकरिता काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीनिशी राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

  गेली 19 वर्ष अनेक चढ उतार, विरोधी पक्षांचा अपप्रचार आणि हीन पातळीवरची हेटाळणी सहन करत श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे समर्थपणे नेतृत्व करून पक्षाला पुन्हा सत्तेत आणले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारच्या १० वर्षाच्या कार्यकाळात देशाची अमुलाग्र प्रगती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षा, मनरेगा, लोकपाल शिक्षणाचा अधिकार, माहिती अधिकार, महिला सुरक्षे करिता निर्भया कायदा, 72 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी असे ऐतिहासीक निर्णय घेतले गेले. पंतप्रधान पदाचा त्याग करून त्यांनी काँग्रेसच्या गौरवशाली त्याग आणि समर्पणाच्या परंपरेची मशाल समर्थपणे तेवत ठेवली. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ताच नव्हे तर देशाचा प्रत्येक नागरिक त्यांचे अगाध कर्तृत्व, बहुमुल्य योगदान व त्याग कायम स्मरणात ठेवेल.

  काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सोनिया गांधी यांनी केलेल्या देशसेवेबद्दल आणि दिलेल्या अपूर्व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करित आहे असे खा. चव्हाण म्हणाले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145