मुंबई : भाजपने येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजपने केली.
दुसरीकडे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपने कापलेला आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र त्यांची संधी हुकल्याचे दिसते.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त आहेत. बहुमताचा आकडा पाहता भाजप-अजित पवार गट आणि शिवसेनेच्या महायुतीला पाच जागा मिळण्यात काहीही अडचण नाही. तर महाविकास आघाडीच्या पदरात एका जागा पडण्याची शक्यता आहे. यातही आघाडीतील काँग्रेस पक्षाला ही जागा मिळणार, अशी माहिती समोर येत आहे.