Published On : Sat, Jun 6th, 2020

लॉकडाऊनमध्ये चित्रकारांचा साधला जातोय कला संवाद

Advertisement

नागपूरच्या आर्ट कट्टा ग्रृपचा उपक्रम: घरबसल्या जोपासा कलेचा वारसा

नागपूर: सध्या लॉकडाऊनमुळे सगळ जग स्थिर आहे. या वातावरणात लोकांना आधार मिळाला तो सोशल मिडियाचा. घरातच रहायच म्हटल्यावर वेळ घालवण्यासाठी प्रत्येक जण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब यासारख्या वेगवेगळ्या मिडियाचा वापर करताना दिसून येत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या गृ्रपच्या माध्यमातून राबविले जात आहे. ‘कला संवाद’ हा असाच एक उपक्रम नागपूरच्या आर्ट कट्टा ग्रृपने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक महिन्यापासून राबविला.

घरबसल्या जोपासा, वारसा कलेचा या टॅगलाईनचा वापर करीत लॉकडाऊनच्या काळात कलाकारांची कलेच्या मार्फत कलारसिकाची जुळलेली नाळ टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिन्याभरात त्याचे पाच भाग तयार केले. चित्रकलेच्या वेगवेगळ्या विषयाची माहिती यातून कलारसिकांना मिळाली. यामध्ये आतापर्यंत कलाशिक्षण तज्ञ व सर जे.जे. स्कुल आॅफ आर्ट, मुंबईचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे, प्राध्यापिका सीमा गोंडाणे, कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूरचे प्रा. विनोद चव्हाण, प्रा. डॉ. किशोर इंगळे, मुंबईच्या चित्रकार डॉ. मिनल राजुरकर यांनी यात सहभाग घेतलेला होता. लँडस्केप पेंटिंग, लिथोग्राफी मुद्रण कला, ब्रिटिश कालीन कलासंस्था व भारतीय कलेचे पुनरुत्थान, ग्राफिटी एक कला संवाद आदी विषयावर सखोल माहिती देण्यात आली. हि माहिती कलाविद्यार्थ्यांना व कलारसिकांना फारच उपयुक्त आहे. ‘आर्ट कट्टा’वर जाऊन कला संवाद कार्यक्रम नक्कीच बघावा असे आवाहन नागपूरच्या या ग्रुपच्या युवकांनी केले आहे.

एखादी गोष्ट सरळ न सांगता जेव्हा कलेच्या माध्यमातून जगापुढे येते तेव्हा ती जास्त प्रभावीपणे रसिकांच्या मनाला भीडते. हेच हेरून ‘आर्ट कट्टा’ ग्रुपच्या युवकांनी कला क्षेत्राची अद्ययावत माहिती ‘आर्ट कट्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत कला संवाद कार्यक्रमाचे व्हिडिओ तयार करण्यात आले. सहभागी सर्व कलाकारांनी व आर्ट कट्टाची निवेदिका स्नेहल अलोनी हीने देखील घरी राहूनच विडीओचे चित्रीकरण केले.

या सर्वांना चित्रिकरणासाठी त्यांच्या घरातील सदस्यांनीच त्यांना मदत केली, हे विशेष. चित्रकारांना चित्रीकरणाचे कुठलेही अनुभव नसतानासुध्दा आर्ट कट्टा ग्रृपचे डायरेक्टर, एडिटर नितीन काळबांडे यांच्या फोनवरच्या मार्गदर्शनाने चित्रीकरण करण्यात आले. निवेदिकेचे लिखाण नितीन काळबांडे व मुंबईचे चित्रकार प्रविण धानुस्कर यांनी केले. आर्ट कट्टा ग्रृपचे सुधिर बागडे, सदस्य मंगेश कापसे, प्रवीण धानुस्कर यांनी सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी स्नेहल अलोनी, राजेंद्र सोमकुवर, जितेंद्र रक्षे यांनी सहकार्य केले.