वर्धा – सुमारे दहा वर्षांपासून संधिवाताने ग्रासलेल्या आणि कालांतराने गुडघेदुखी वाढत गेल्यामुळे अंथरुणाला खिळलेल्या एका अडतीस वर्षीय महिला रुग्णाला पुन्हा चालतेफिरते करण्याची किमया सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिरोग विभागाद्वारे करण्यात आली.
पुलगाव येथील रहिवासी कौसर इम्रान कुरेशी (३८) ही महिला संधिवाताने दीर्घकाळापासून त्रस्त होती. मधल्या काळात अनेक प्रकारचे परंपरागत उपचार करण्यात आले आणि त्यातून रुग्णाला तात्पुरता आराम मिळत राहिला. मात्र कायमचा इलाज न झाल्यामुळे हा वेदनादायी त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. या त्रासामुळे रुग्णाला गुडघे वाकविणे आणि पाय सरळ करणेही अशक्य होऊ लागले. हळूहळू दोन्ही गुडघे काम करेनासे झाले. इतरांच्या आधाराशिवाय तिला उभे राहणे शक्य होत नव्हते. कालांतराने हा त्रास इतका वाढत गेला की रुग्णाचे चालणेच बंद झाले आणि ती जास्तीतजास्त वेळ अंथरुणावर राहू लागली.
या दरम्यान परिचितांनी पारंपरिक इलाज थांबवून अद्यावत वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. रुग्णाला तिच्या परिवाराने सावंगी मेघे रुग्णालयातील अस्थिरोग विभागात भरती केले. रुग्णालयात आर्थ्रोप्लास्टी सर्जन डॉ. गजानन पिसूळकर यांनी तपासणी केली असता दोन्ही गुडघे निकामी झाल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेद्वारे दोन्ही पायांचे गुडघे पूर्णतः बदलण्याशिवाय अन्य कोणताही मार्ग नसल्याचे यावेळी डॉ. पिसूळकर यांनी रुग्णपरिवाराच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णाच्या संमतीने सावंगी रुग्णालयातील अद्ययावत शल्यचिकित्सा गृहात टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली.
दत्ता नेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. संदीप श्रीवास्तव व अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर अंबादे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गजानन पिसूळकर व सहकारी डॉ. हितेंद्र वांबोरीकर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेली. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णपरिवाराला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेद्वारे आर्थिक सहकार्यही प्राप्त झाले. उपचारांनंतर आजारातून बरे होण्याचा भरती कार्यकाळ पूर्ण झाल्यावर रुग्णाला सुटी देण्यात आली.
कौसर नेहमीसाठी अंथरुणाला ती खिळून राहील की काय, अशी शंका परिवारातील सदस्यांच्या मनात असतानाच ती आता इतरांच्या आधाराशिवाय चालायला लागली आहे. ती पूर्णपणे बरी झाली असून तिचे प्रत्येक पाऊल अन्य रुग्णांसाठी प्रेरणादायी आहे, असे डॉ. पिसूळकर म्हणाले.