Published On : Sat, Jun 2nd, 2018

संविधानापेक्षा कोणी मोठा नाही; संविधानाचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेला अटक करा – रामदास आठवले

पालघर: भारतीय संविधान लोकशाही राज्यव्यवस्थेत सर्वश्रेष्ठ आहे. संविधानापेक्षा कोणी मोठा नाही मात्र नंदुरबार येथे धर्मनिरपेक्षता मान्य नसल्याचे सांगत संविधानाचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेला अटक केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पालघर येथील काँग्रेस मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत केली.

पालघर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ना रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांचा आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विचारमंचावर रिपाइंचे सुरेशदादा बारशिंग, रिपाइं पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, ऍड. ईश्वर धुळे, सचिन लोखंडे, बाळाराम गायकवाड, चंदन संख्ये, बाळकृष्ण गायकवाड, हेमंत रणपिसे, घनश्याम चिरणकर, रोहिणी गायकवाड, लक्ष्मी हजारे, आशाताई दहाड, संध्या राऊत, बिंदीया दिक्षीत, चंदा दुबे, आदी मान्यवर उपस्थित होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान विश्वातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे.संविधानामुळे भारतीय लोकशाही मजबूत आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेकदा सांगितले आहे की संविधान हा माझा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे.देशासाठी आणि सर्व धर्मांसाठी संविधान श्रेष्ठ आहे. ज्याला संविधान मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही.