
नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाने आज निर्णायक वळण घेतलं आहे. नागपूर–हैदराबाद महामार्गावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनावर उच्च न्यायालयाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामं करण्याचा आदेश दिल्यानंतर वातावरण तापलं.
सरकारकडून मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जैसवाल हे कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले, मात्र ती चर्चा निष्फळ ठरली. यानंतर संतप्त कडू यांनी थेट पोलिसांकडे अटक घेण्यासाठी मोर्चा वळवला.
कडू यांनी पोलिसांना पत्र लिहून सरकारला इशारा दिला आहे. त्या पत्रात त्यांनी ठणकावून म्हटलं ,आम्ही न्यायालयाचा सन्मान ठेवतो, पण आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. जर आंदोलन संपवायचं असेल, तर आमची व्यवस्था थेट जेलमध्ये करा.”
कडू पुढे म्हणाले ,सरकारचं शिष्टमंडळ आम्हाला चार वाजता भेटणार होतं, पण त्यांनी कोर्टाचा आदेश आल्यानंतरच भेट घेतली. आम्ही कोणत्याही मंत्र्यांना भेटणार नाही. आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आमच्याशी संवाद साधावा.
या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बच्चू कडूंच्या या ठाम भूमिकेमुळे शेतकरी आंदोलनाचं वातावरण आणखी चिघळलं असून, नागपूरमध्ये पुढील काही तासांत परिस्थिती राजकीयदृष्ट्या स्फोटक बनण्याची चिन्हं आहेत.










