
नागपूर : रामटेक पोलिसांच्या हद्दीतील बोर्डा गावात दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या एका जवानाने साथीदारांच्या मदतीने पत्नीची हत्या केली.
सप्टेंबरमध्ये हा गुन्हा घडला होता. पत्नीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर लष्करी जवान पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल.याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपीसह आणखी एक साथीदार अद्याप फरार आहेत.
रामटेक पोलिस ठाण्याचे निरीक्षक आसाराम शेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदा उर्फ भारती नरवणरे (22) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती सचिन घरत याने तीन साथीदारांच्या मदतीने गळा आवळून तिचा खून केला. सचिन आणि त्याचा साथीदार नरेंद्र दोडके हे दोघेही फरार आहेत. दरम्यान, पोलिसांनी राहुल चौके (27) आणि भुनेश्वर गजबे (18) या दोघांना अटक केली. सचिनने घटस्फोटाचा प्रस्ताव घेऊन यशोदाशी संपर्क साधला होता, ज्याला तिने नकार दिला होता. त्यानंतर त्याने तिचे अपहरण आणि हत्या घडवून आणली आणि नंतर तिच्या मृतदेहाची मध्य प्रदेशातील नर्मदा नदीत फेकल्याची माहिती समोर आली आहे.









