Published On : Mon, Jun 10th, 2019

अर्जुनाच्या ‘लक्ष्या’ प्रमाणे विधानसभा निवडणुकीत काम करा – शरद पवार

Advertisement

मुंबई अर्जुनाचे संपूर्ण लक्ष त्या पोपटाच्या डोळ्यावर होते त्याप्रमाणे या विधानसभा निवडणूकीत काही झाले तरी पक्षाला यश देणारच अशाप्रकारे सर्वांनी काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसची बैठक आज प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी त्यांनी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे संघटनेत एक अस्वस्थता होती. त्यामुळे हा मेळावा बोलावला आहे . असा निकाल लागणार असे अपेक्षित नव्हते मात्र पराभव मिळाला म्हणून खचून जायचे नसते. जय मिळाला म्हणून हवेत रहायचे नसते. जय – पराजय हा भाग असतोच. निकाल आपल्या बाजूला लागला नाही म्हणून नाउमेद होऊ नका असा सल्ला शरद पवार यांनी दिला.

एक काळ होता तेव्हा आम्हाला ५४ लोकं सोडून गेले होते. फक्त ६ लोकं उरले होते. पण आम्ही जोमाने काम केले ६० लोकं निवडून आणले आणि सोडून गेलेल्या ५१ लोकांचा कार्यक्रम केला. आता आपल्याला पुन्हा त्याच जिद्दीने लढायचे आहे. काँग्रेस आघाडी करण्यावर ठाम आहे. आणखी समविचारी लोकांना एकत्र घेऊ आणि विधानसभा निवडणुकांना सामोरं जावू असा जबरदस्त आत्मविश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवाद जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडले. त्यामुळे देशात असा निकाल लागला. विधानसभा निवडणूक वेगळी असते. महाराष्ट्रात भाजपकडे चेहरा नाही. महाराष्ट्रात पर्याय कोण देवू शकतो असा लोकांना प्रश्न आहे. त्यामुळे आपण लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय द्यायचा. त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवं असेही शरद पवार यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी आरएसएस विषयीच्या माझ्या वक्तव्याबाबत संभ्रम निर्माण केला गेला. आरएसएसची विचारधारा स्वीकारा असे मी कधीच म्हणालो नाही. आरएसएसचे कार्यकर्ते ज्या चिकाटीने काम करतात त्याप्रमाणे आपण काम करायला हवे असे माझे मत होते असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत ही लोकांशी थेट संवाद साधा-सुप्रिया सुळे

जो पॅटर्न बारामतीत होता तोच पॅटर्न शिरूरमध्ये लावला. लोकांशी थेट संवाद साधला म्हणून हे शक्य झाले. विधानसभेत ही लोकांशी थेट संवाद साधा असे आवाहन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.

माझ्या विजयाचं श्रेय प्रत्येक कार्यकर्त्यांना जातं. कुणीही स्वस्थ बसले नव्हते. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री सर्वच बारामतीत तळ ठोकून होते पण आम्ही सर्व डावपेच उलथून टाकले असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.

तर नक्कीच तुम्हाला त्याचे श्रेय दिले जाईल-जयंत पाटील

काही महिने तुम्ही पक्षासाठी काम करा.. जीवाचे रान करा… तेवढा प्रभावी संपर्क राहील तेवढे आपले यश निश्चित असून प्रतिकूल परिस्थितीत आपण साथ द्या सत्ता आली तर नक्कीच तुम्हाला त्याचे श्रेय दिले जाईल असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिले.

आपण काय काम केले ते लोकांना सांगणे गरजेचे आहे. तुटपुंजी कामे करून मोदींनी क्रेडिट घेतले मग आपण १५ वर्षे कामे केले ते आपण का सांगू नये ? असा सवाल जयंतराव पाटील यांनी केला.

प्रदेश जे काम देईल ते महिला पदाधिकाऱ्यांनी पूर्णत्वास नेले पाहिजे असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले.

बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार वंदना चव्हाण, आमदार विदया चव्हाण यांनीही आपले विचार मांडले.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,
ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उषाताई दराडे, माजी प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे आदींसह पक्षाच्या नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.