
मुंबई: बॉलिवूड संगीतसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक असलेल्या अरिजीत सिंग यांनी अधिकृतपणे प्लेबॅक गायनातून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि संगीतप्रेमींमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अरिजीत सिंग यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, यापुढे ते चित्रपटांसाठी कोणतीही नवीन गाणी गाणार नाहीत.
“हा प्रवास अत्यंत सुंदर होता. आता हा अध्याय इथेच संपवत आहे. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया; सोशल मीडियावर भावनिक संदेश
अरिजीत सिंग यांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर चाहत्यांनी आश्चर्य, दुःख आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेकांनी हा निर्णय बॉलिवूड संगीतसृष्टीसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ अरिजीत सिंग हे हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि भरोसेमंद आवाज म्हणून ओळखले जात होते.
संगीतविश्वाशी नातं कायम
महत्त्वाचे म्हणजे, अरिजीत सिंग यांनी संगीतापासून पूर्णतः दूर जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. ते पुढील काळात स्वतंत्र संगीत प्रकल्पांवर काम करणार असून, वैयक्तिक स्वरूपात संगीतप्रेमींशी जोडलेले राहतील. म्हणजेच चित्रपटांसाठी गाणी गाणार नसले, तरी संगीताच्या दुनियेत त्यांची उपस्थिती कायम राहणार आहे.








