Published On : Thu, Apr 6th, 2017

शहराच्या विकासाच्या दृष्टीने स्थापत्य व विशेष प्रकल्प समिती महत्त्वपूर्ण

Nagpur: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘ड्रीम सिटी’ साकारण्यासाठी स्थापत्य व विशेष प्रकल्प समिती महत्त्वाची ठरणार आहे. शहरात सुरूअसलेल्या प्रकल्पांना वेळेत पूर्ण करणे, प्रस्तावित प्रकल्पांना वेळेत सुरुवात करुन पूर्ण करणे, तसेच विविध विकास प्रकल्पासाठी निधी, परवानगी आदींची जबाबादारी या समितीची असणार असून संघटनात्मक व प्रशासकीय दृष्टीने सक्षम असलेले नगरसेवक संजय बंगाले यांची या समितीच्या सभापतीपदी नियुक्ती केल्याने शहराच्या विकास व सर्व प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला.

मनपा मुख्यालयात स्थापत्य व विशेष प्रकल्प समितीच्या सभापती पदाचा पदभार संजय बंगाले यांनी सोमवारी (ता. ३ मार्च) स्वीकारला. प्रामुख्याने महापौर नंदाताई जिचकार, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौरदीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, माजी सत्तापक्ष नेते ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी,समितीचे उपसभापती अभय गोटेकर, धरमपेठ झोनच्या सभापती रूपा रॉय यांच्यासह समिती सदस्यांची उपस्थिती होती.

यावेळी महापौर नंदाताई जिचकार म्हणाल्य़ा, सध्या सुरु असलेल्या विकास प्रकल्पांवर लक्ष ठेवून त्यांना वेळेत पूर्ण करणे आदी महत्त्वाची जबाबदारी संजय बंगाले यांनी स्वीकारली ते निश्चितपणे यशस्वीपणे पार पाडतील, असे सांगत त्यांनी बंगाले यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.