- विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
- काम न करणा-या अधिका-यांविरूद्ध कारवाई,
- शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात संवेदनशीलपणे काम करा
- शेतक-यांना विजेचे कनेक्शन तत्काळ द्या
- वीज कंत्राटादारांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा
वर्धा। जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्त्वपूर्ण व प्राधान्य असलेला कार्यक्रम असून पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची प्रस्तावित कामे पूर्ण न करणा-या अधिका-यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासोबतच सेवा पुस्तकातही नोंद घेण्यात येईल, वर्धा जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानाला अधिक गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात.
विकास भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरी तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चित्राताई रणनवरे, खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे, डॉ.पंकज भोयर, समीर कुणावार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मनरेगा आयुक्त एम.संकरनारायणन्, जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना व्यासपीठावर उपस्थित होते.
जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत 214 गावांमध्ये कामाचे नियोजन करण्यात आले असून अत्यल्प कामे सुरू झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असमाधान व्यक्त करताना पावसाळ्यापूर्वी प्रस्तावित केलेली संपूर्ण कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रंणांची असून कामे पूर्ण न करणा-या अधिका-यांच्या गोपनीय अहवालामध्ये नोंद घेण्यात येईल. शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा दर आठवड्याला यंत्रणांनिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतक-यांना सिंचन विहिरींचा लाभ मिळावा, यासाठी अधिक-यांनी संवेदनशीलपणे राहून प्रत्यक्ष काम पूर्ण होईल, याची दक्षता घेण्याची सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले, की धडक सिंचन विहिरी सोबतच विविध योजनांतर्गत शेतक-यांना विजेचे कनेक्शन देण्यासाठी अधिका-यांनी तत्काळ कारवाई करावी, विहिरींसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतक-याला कनेक्शन मिळेपर्यंत पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला असून ज्या वीज कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण केलेली नाहीत, अशा कंत्राटदारांविरूद्ध तत्काळ कारवाई सोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात.
धडक सिंचन विहिरींतर्गत जिल्ह्याला 10 हजार 400 विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले होते, त्यापैकी 7 हजार 981 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून प्रत्यक्षात 5 हजार 513 विहिरींची कामेच प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. शेतक-यांना सिंचनासाठी विहिरींचा लाभ देताना धडक सिंचन विहिरींचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासोबतच नरेगांतर्गतही कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा, अशा सूचना करताना मुख्यमंत्र्यांनी मार्चअखेरपर्यंत विहिरी पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्यात. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचा कार्यक्रम राबविताना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी तसेच शासन निर्णयामध्ये आवश्यक बदल करण्यात येईल.
शेतक-यांच्या शेतातील खचलेल्या विहिरी नरेगांतर्गतच पूर्ण करा, अशा सूचनाही यावेळी दिल्यात. जिल्ह्यात 3 हजार 588 शेतक-यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 2 हजार 635 लाभार्थी निकषात बसत असून इतर शेतक-यांच्या अर्जांसंदर्भातही प्राधान्याने विचार करा, अशा सूचना दिल्यात.
विहिरींचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींच्या कार्यक्रमांसोबतच जलसंधारणाची कामे प्राधान्याने घेऊन पूर्ण करण्यासोबतच शेतक-यांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडक सिंचन विहिरी व मनरेगांतर्गत विहिरींचा कार्यक्रम समाधानकारक असून जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्ह्यातील विविध कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. विभागीय आयुक्तांनी आढावा घेऊन प्रत्येक कामाबाबत अधिका-यांच्या सहभागाबाबत विभागनिहाय अहवाल तयार करावा, अशा सूचना करतानाच दर आठवड्याला हा अहवाल सादर करावा, असे निर्देशही यावेळी दिले.
प्रारंभी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी स्वागत केले. तर जलयुक्त शिवार अभियानाची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना यांनी दिली. खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर यांनीही जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरींच्या कामांबाबत विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी आभार मानले.