Published On : Tue, Sep 29th, 2020

‘आपली बस’ सुरू करण्याचे प्रस्तावाला मंजूरी

Advertisement

परिवहन विशेष समितीच्या बैठकीत निर्णय : ५० टक्के उपस्थितीसह सुरक्षेची काळजी घ्या

नागपूर: कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा ते सात महिन्यांपासून बंद असलेली ‘आपली बस’ ही शहर बस सेवा सुरू करण्याचे प्रस्तावाला परिवहन विशेष समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिंपरुडे, विनय भारद्वाज यांच्यासह व्हिडिओ कॉन्फर्न्सींगद्वारे परिवहन समिती सदस्य नितीन साठवणे, रुपा राय, वैशाली रोहनकर, रुपाली ठाकुर, राजेश घोडपागे उपस्थित होते.

कोव्हिडच्या वाढत्या संसर्गामुळे ‘आपली बस’ची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्य शासनातर्फे ‘अनलॉक’ सुरू करण्यात आले असून त्या अंतर्गत राज्य परिवहन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आजघडीला संपूर्ण राज्यात १०० टक्के प्रवासी क्षमतेसह राज्य परिवहन बस सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर नागपूर शहरातील ‘आपली बस’ सेवा सुरू करण्यात यावी, याविषयी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चर्चा उपस्थित केली.

आज शहरातील सर्वच आस्थापना, व्यवसाय, उद्योग, कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे ‘आपली बस’च्या आधारे कामावर जाणा-यांचे चांगलेच हाल होत आहेत. ‘आपली बस’ सेवा बंद असल्यामुळे प्रवासासाठी ज्यादा भाडेही द्यावे लागत आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या परिवहन बस सेवेप्रमाणेच शहर बस सेवा सुद्धा सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी समितीच्या सदस्यांमार्फत करण्यात आली.

यासंदर्भात बोलताना परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर म्हणाले, शहरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ‘आपली बस’ सुरू करण्याची गरज आहे. मात्र यासोबतच कोव्हिडच्या संसर्गाचा धोका होऊ नये यासाठी आवश्यक काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने ५० टक्के प्रवासी वाहतुकीसह ‘आपली बस’ सुरू करणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये आवश्यक त्या सर्व नियमांच्या पालनासह समितीद्वारे बस सेवा सुरू करण्याचे प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात येणार असल्याचेही सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सांगितले.