Published On : Wed, Aug 5th, 2020

स्वयम् संस्थेच्या उपक्रमाचे महसूल मंत्र्यांकडून कौतुक

Advertisement

विशाल मुत्तेमवार व बाळासाहेब थोरात यांची युवा मार्गदर्शनावर चर्चा

नागपूर : युवकांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणारी स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबच्या वतीने पोलीस भरती ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना नागपूर भेटीदरम्यान स्वयम संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी दिली. स्वयम् संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून पोलीस भरती ऑनलाईन मार्गदर्शनामुळे शहरासह ग्रामस्तरावरील युवक-युवतींना तयारीची अचूक दिशा मिळेल, असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात आगामी काळात १२ हजार पदांची पोलीस विभागात भरती होणार आहे. या भरतीसाठी राज्यातील मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग तयारी करीत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र शिकवणी वर्ग बंद असल्याने युवकांना पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे.

युवकांची समस्या लक्षात घेऊन स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा, तालुका आणि गावखेड्यांतील युवक-युवतींपर्यंत तो पोहोचविला जाईल. यामध्ये लेखी परीक्षा, मैदानी चाचणी मार्गदर्शन तसेच सराव पेपरचा समावेश असेल.

या सर्व ऑनलाईन मार्गदर्शन उपक्रमाची माहिती विशाल मुत्तेमवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितली. श्री. थोरात यांनी गरजू आणि होतकरू युवक-युवतींसाठी सुरू केलेल्या या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व जास्तीत जास्त युवकांनी या ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.