Published On : Thu, Aug 24th, 2017

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी 15 सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

· 15 सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक
· तहसिल, महसूल मंडळ कार्यालयात विशेष शिबीर
· सर्व ई-सुविधा, सीएससी केंद्रात ऑनलाईन अर्ज सुविधा
· एनडीसीसी बँकेच्या 72 शाखेत अर्ज भरण्याची सुविधा
Sachin Kurve
नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी सभासदांना कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी 15 सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज केल्यानंतरच या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे सर्व शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी तालुकास्तरावरील सर्व ई-सुविधा केंद्रामध्ये तसेच सेतू केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच येत्या शनिवारपासून तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय येथे विशेष ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जावून शेतकरी सभासदांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करावे. यासोबतच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हयातील 72 शाखांमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येतील. या योजनेच्या लाभासाठी अर्जदार व पती/पत्नीसह अर्ज भरणे बंधनकारक आहे.

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शासनाने 1 एप्रिल 2009 नंतरचे वाटप झालेले मात्र 30 जून 2016 रोजी थकीत असलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार असून दीड लाखापेक्षा जास्त असलेल्या कर्जाची रक्कम भरणा केल्यास शासनाकडून दीड लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हयात राष्ट्रीयकृत बँकांचे सुमारे 26 हजार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण 24 हजार अशा सुमारे 50 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत जिल्हयात 14 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

Advertisement

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी दिनांक 15 सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ही नोंदणी करताना शेतकरी सभासदांनी अर्जदार व पती/पत्नीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे कर्जमाफीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी महा ई-सेवाकेंद्र, सुविधा केंद्र, तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 72 शाखासह तहसिल कार्यालय, तसेच मंडळ कार्यालयात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेवून कर्जमाफी योजनेत सहभाग घ्यावा. प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, तसेच कृषी विकास अधिकारी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सहाय्य करणार आहे. तालुकास्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करणार आहेत.

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक संपूर्ण मदत करणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी 15 सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करुन या योजनेत सहभागी व्हावेत, असे आवाहन केले आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement