Ashwin Mudgal
नागपूर: पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतांना पाणी टंचाई आराखड्यानुसार मंजूर झालेले 3 हजार उपाययोजनांच्या कामांची अंमलबजावणी तातडीने पूर्ण करा तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल अशा गावात तातडीच्या उपाययोजना लागू करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 699 गावांसाठी टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार 3 हजार 29 उपाययोजना प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली असून यामध्ये 315 नळयोजनांची दुरुस्ती, 925 नवीन विंधन विहिरी, 132 विहिर खोल करणे, 73 खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यासोबतच मागणीनुसार 32 टॅंकर लावण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी यांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई अंतर्गत 50 कोटी 57 लाख रुपये खर्चाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
पाणी टंचाई कृती आराखड्याची तीन भागात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ऑक्टोंबर 2017 पर्यत सरासरी 1037.4 मिलीमीटर पैकी प्रत्यक्ष 811.9 मिलीमीटर म्हणजेच 78.26 टक्के पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाद्वारे राबविण्यात आलेल्या विविध कामांमुळे भूजल पातळी सरासरी वाढल्यामुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल अशा गावात टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना सूचना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
पाणी टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात 646 उपाययोजना तसेच दुसऱ्या टप्प्यात 1 हजार 516 उपाययोजना व अंतिम टप्प्यात 837 उपाययोजनांना प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यात टंचाई असलेल्या गावात तात्काळ उपाययोजना लागू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असल्याची माहिती अश्विन मुदगल यांनी दिली.