Published On : Fri, Dec 8th, 2017

कृषी धोरणावर तीव्र नाराजी; पटोलेंकडे काँग्रसचे लक्ष

Advertisement

Nana Patole
गोंदिया: देशात इतिहासात पहिल्यांदा सर्वात जास्त बहुमत घेऊन आलेल्या नरेंद्र मोदी सरकारमधील पहिल्या खासदाराने राजीनामा दिला आहे. गुजरात निवडणुकीच्या मतदानाआधी, भाजप सरकारमधील खासदाराने राजीनामा देणे, हे निश्चितच भाजपसाठी धक्कादायक आहे.विशेष म्हणजे नाना पटोले हे नेहमीच शेतकरी व सामान्यांच्या मु्द्यावर राजीनामा देत आपल्याच सरकारच्या विरोधात लढत राहिले आहेत.त्यांनी यापुर्वी काँग्रेसमध्ये आमदार असतांना शेतकरी हितासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता.सप्टेंबर २०१७ या महिन्यात राजीनामा देण्यासंबंधी त्यांनी पहिल्यांदा वाच्यता केली होती, २ महिन्यांनी नानांची नाराजी अनेक कारणांनी पुन्हा उफाळून आली आणि त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आहे.त्यांच्या मनात मोठ्याप्रमाणात खदखद असल्याचे जाणवत होते.पक्षनेंत्याकडे भूमिका मांडूनही सातत्याने लक्ष दिले गेले नाही यांची खंत व्यक्त पटोले यांनी केली आहे.पटोलेंचा राजीनामा हा उद्या गुजरातच्या पहिल्या टप्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महत्वाचा राहणार आहे.

पटोले यांनी अकोल्यात 25 सप्टेंबरलाच राजीनाम्याचे संकेत दिले होते.राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावले उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असे म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले होते. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरे आहे. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षाने काय कारवाई करायची ती करु दे.’ असे म्हणत नाना पटोले यांनी वेळोवेळी सरकारवर टीकास्त्र सोडले होते.

भाजपमध्ये राहून विरोध करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये यावे, असे चव्हाण म्हणाले होते.7 नोव्हेंबरला काँग्रेसने अमरावतीत विभागीय जनआक्रोश मेळावा घेतला होता. यावेळी चव्हाण यांनी पटोलेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर केली होती.

कृषी धोरणावर तीव्र नाराजी
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारच्या कृषी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले हे मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या मोदी सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत होते.पटोले हे अनेकवेळा इतर पक्षाच्या नेत्यांशी भेटताना देखील दिसले होते. “देवेंद्र फडणवीस सरकार हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत आले आहे. सर्वात आधी म्हणजे निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. आवाजी मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीने विधानसभेत पाठिंबा दिल्याने, दप्तरी नोंद भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा अशी झाली आहे. त्यामुळे सध्याचे सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर नाही तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे.”असे पटोलेंनी म्हटले होते.

मोदींना मंत्री घाबरतात -वादग्रस्त वक्तव्य
नाना पटोले यांनी सरकारविरोधातील वक्तव्य पुण्यात करताना म्हटले होते, मोदींना मंत्री घाबरतात, मात्र यावर दुसऱ्या दिवशीच नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण दिले होते. तर संघप्रमुख मोहन भागवत यांच्या आरक्षणविरोधी भूमिकेमूळेच बिहारमध्ये भाजपला पराभव स्विकारावा लागल्याचेही एका कार्यक्रमात म्हणाले होते.

प्रफुल्ल पटेलांना हरवणाऱ्या खासदाराचा राजीनामा
नाना पटोले हे महाराष्ट्रातून भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना राष्ट्रावादीचे उमेदवार, आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक, प्रफुल्ल पटेल यांना १ लाख ३८ हजार ८१८ मतांनी पराभूत करून विजयी झाले होते.

54 वर्षीय नाना पटोलेंचा जन्म भंडाऱा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकडी येथील फाल्गुनराव पटोले शेतकरी कुटुंबात झाला.शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मोठे काम, मतदारसंघात करणारे म्हणून नानाभाऊ म्हणून परिचित आहेत.1990 साली भंडाऱ्यातील सांनगडीतून जिल्हा परिषदेवर निवडून गेले.1999 पासून सलग तीन वेळा साकोली मतदारसंघातून विधानसभेवर गेले.काँग्रेसचे उपनेते म्हणूनही काम, 2009 आधी पक्षाच्या धोरणावर नाराज होऊन काँग्रेसमधून बाहेर पडले.2009 ची लोकसभा अपक्ष लढविली.त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करुन 2009 मध्ये साकोली मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले होते.त्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली.या निवडणुकीच्या प्रचारासाठी खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेलांचा 1 लाख 49 हजार मतांनी पराभव केला होता.