Published On : Thu, Aug 30th, 2018

विकासकामे सामान्य घटकापर्यंत पोहचविल्याचे समाधान – अनूप कुमार

Advertisement

नागपूर: नैसर्गिक संपदेने समृद्ध असलेल्या विभागामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना विविध क्षेत्रात विकास योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी झाली आहे. या विभागात विकास कामे सामान्य घटकापर्यंत पोहचविल्याचे समाधान मिळाले असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले. बचतभवन येथे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांना आज निरोप देण्यात आला. त्यांची कृषी व पदुम विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्त झाली आहे.

यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त रविंद्र ठाकरे यांनाही निरोप देण्यात आला तसेच नूतन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हाधिकारी नागपूर अश्विन मुदगल, भंडारा शांतनू गोयल, गोंदिया डॉ.कादंबरी बलकवडे, गडचिरोली शेखर सिंह, वर्धा शैलेश नवाल तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर संजय यादव, गोंदिया एम.राजा दयानिधी, गडचिरोली विजय राठोड, वर्धा अजय गुल्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनूप कुमार यांनी त्यांच्या विदर्भातील अकोला जिल्हाधिकारी, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक ते नागपूर विभागीय आयुक्त पदापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवताना म्हणाले की, विदर्भात काम करण्याच्या खूप मोठ्या संधी आहेत. प्रशासनात जनतेच्या हिताची काम करताना कर्तव्य कठोरही व्हावे लागते असे सांगत अनूप कुमार यांनी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना त्यांचे छंद जोपासण्याचा सल्लाही यावेळी दिला. विदर्भात नैसर्गिक संसाधने, नैसर्गिक संपदा मोठ्या प्रमाणावर आहे. येथील संसाधनांमध्ये मोठी क्षमता असून, त्यासोबतच विदर्भातील जनता कठोर मेहनती असल्याचे जवळून पाहायला मिळाले. मात्र, त्यांना योग्यवेळी मार्गदर्शन न मिळाल्याची सलही त्यांनी बोलून दाखवली.

तत्कालीन मंत्र्यांसोबत काम करताना राज्याच्या विविध भागातील विकास आणि पूर्व विदर्भाच्या स्थितीतील तफावत समजली. त्यामुळे मिहानमधील विविध उद्योग, माजी मालगुजारी तलावाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाच्या संधी, नैसर्गिक वनसंपदा, त्यातून वनांवर आधारीत उद्योग, कालिदास महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, येथील मारबतीची परंपरा, संत-साहित्यिकांची भूमी म्हणून काम करण्याचे आत्मिक समाधान मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच यापुढे राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागात प्रधान सचिव म्हणून जात असल्यामुळे सर्वांसोबत संबंध राहतीलच, असे सांगून ते म्हणाले की, मराठवाडा विदर्भातील पशुपालन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायाला गती देण्याचे काम प्राधान्याने करणार आहे. मिळालेल्या संधीचे सोने करताना कृषी व

पदुमच्या कामात महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भ अग्रस्थानी असेल, असे ते म्हणाले. विशेष करुन विदर्भातील मामा तलावांच्या माध्यमातून नीलक्रांतीला मोठा वाव आहे. त्यामुळे येथील युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

विदर्भ हा नैसर्गिक संसाधनांनी युक्त असा प्रदेश असून, येथे विकासाच्या खूप मोठ्या संधी आहे. गेल्या चार वर्षाच्या काळात विदर्भाला विकासाच्या महामार्गावर नेण्याचे स्वप्न पाहणारे नेते मिळाले. इथे काम करताना विदर्भ ही माझी कर्मभूमी झाल्याचे लक्षातही आले नाही. म्हणून निरोपाचे गाणे गावेसे वाटत नाही, अशा शब्दांमध्ये विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी भावना व्यक्त केल्या.

अलाहाबादसारख्या छोट्या शहरातून आल्यामुळे मोठ्या शहरात येताना सोशल रिलेशनशीपच निर्माण होते. मात्र नागपूर त्याला अपवाद ठरले. ही भूमी माणुसकीने भरलेली असून, विदर्भात काम करताना आत्मिक समाधान मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली. अनूप कुमार यांनी त्यांच्या ‘याद आयेंगे’ या कवितेने मनोगत संपविले.

तत्पुर्वी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी त्यांच्या हिंगोली येथील प्रशासकीय कामाचे अनुभव कथन करत विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्याशी नागपुरात घेतलेल्या कार्यशाळेच्या निमित्ताने थेट संपर्कात आल्याचे सांगितले. तसेच पूर्व विदर्भातील त्यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या फ्लॅगशिप कार्यक्रमातील विविध योजना, मत्स्यव्यवसायासह जलसंधारणाची कामे त्याच गतीने पुढेही चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अनूप कुमार यांच्या कार्यकाळात विदर्भात राज्य शासनाच्या विविध नामांकित संस्था आल्या. या संस्थांच्या विकासासाठी सतत पाठपुरावा केला. नागपूरच्या झुडपी जंगलांचा प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने मार्गी लावला. शासन पातळीवर वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. ते राबविण्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते. पूर्व विदर्भाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून निवर्तमान विभागीय आयुक्त या नात्याने विभाग राज्यात सतत दुसऱ्या क्रमांकावर ठेवून आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त म्हणून त्यांचे रामटेक तसेच सुरेश भट सभागृह येथील कालिदास महोत्सव, यंदाचे पावसाळी अधिवेशन यासह कला, साहित्य आणि संस्कृती जपली, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी अनूप कुमार यांच्यामुळेच विदर्भातील 8 हजार तलावांमध्ये मत्स्यव्यवसाय वाढीस मोठ्या प्रमाणावर वाव असल्याचे प्रथमच निदर्शनास आल्याचे सांगून त्यादृष्टीने त्यांनी काम केल्याचे सांगितले. तसेच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायातून विकास साधता येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, वर्धाचे अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, महसुल उपायुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त संजय धिवरे, उपायुक्त श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांचीही समायोचित भाषणे झाली. यावेळी अनूप कुमार आणि रविंद्र ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.