
छिंदवाडा : मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप प्रकरणातील आणखी एक दुर्दैवी मृत्यू समोर आला आहे. विषारी कफ सिरपमुळे गंभीर आजारी पडलेल्या चार वर्षीय हर्षचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तब्बल १२८ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर १ फेब्रुवारी रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
हर्ष हा मूळचा छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया येथील रहिवासी होता. २६ सप्टेंबर रोजी त्याला नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले होते. बैतुल जिल्ह्यातील आमला तहसीलमधील टिकाबरी गावात राहणाऱ्या गोकुळ यादव यांचा तो मुलगा होता. विषारी कफ सिरप सेवन केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर बिघडली होती आणि गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ तो कोमात होता. औषधातील घातक घटकांमुळे त्याचे महत्त्वाचे अवयव निकामी झाले होते.
डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर रविवारी रात्री उशिरा त्याने अखेरचा श्वास घेतला. सोमवारी नागपूरमध्ये शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचे पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. बैतुलचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. मनोज हुरमाडे यांनी या घटनेची माहिती दिली.
हर्षच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “आम्ही शेवटपर्यंत आशा बाळगली होती की तो बरा होईल; पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं,” अशा शब्दांत कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली. गावातही शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. छिंदवाडा जिल्ह्यात याच सिरपचे सेवन केल्यानंतर किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तपासात सिरपमध्ये ‘डायथिलीन ग्लायकोल’ हा विषारी घटक आढळून आला होता. डॉक्टरांनी खोकल्यासाठी दिलेल्या औषधामुळेच मुलांचे मृत्यू झाल्याची बाब उघड झाल्यानंतर प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीडित कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत, “वेळीच कडक कारवाई झाली असती आणि औषधांचे काटेकोर निरीक्षण झाले असते, तर निष्पाप मुलांचे जीव गेले नसते,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.








