Published On : Mon, Feb 3rd, 2020

दुसऱ्या दिवशीही २२ बाजारांवर कारवाई

Advertisement

गोकुळपेठ, जाफरनगर बाजार भरलेच नाही : जप्त झालेले सामान नेण्यासाठी मंगळवारी झोन कार्यालयाला घेराव

नागपूर : नागपूर शहरात भरणाऱ्या बाजारांमध्ये रस्त्यावर आणि फुटपाथवर बसून अतिक्रमण करणाऱ्या आणि वाहतुकी अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेली मोहीम दुसऱ्या दिवशीही राबविण्यात आली. दहाही झोनमध्ये एकाच वेळी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. एकाच वेळी दहाही झोनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे वाहतुकीचे मार्ग मोकळे झाले आहेत.

विशेष म्हणजे पहिल्या दिवसाच्या मोहिमेनंतर अनेक ठिकाणी अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर दुकाने थाटलेच नाही. कॉटन मार्केट आणि सक्करदरा परिसरातील बाजारामध्ये हे दृश्य होते. तर दुसरीकडे गोकुळपेठ आणि जाफरनगरमध्ये लागणारे बाजार रविवारी लागलेच नाही. अतिक्रमण करून वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांमध्ये संताप व्यक्त होत असला तरी नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. अनेक आठवडी बाजार निर्धारीत केलेल्या जागांव्यतिरिक्त रस्त्यावर लागत असल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी बराच अडथळा निर्माण होतो. यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबार आणि ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ अशा लोकसंवाद कार्यक्रमातून बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. १ जानेवारीपासून अतिक्रमण हटविण्याची आणि फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते.

दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे रुजू झाल्यानंतर त्यांनी ह्या मोहिमेला वेग दिला. शनिवार १ फेब्रुवारी आणि रविवार २ फेब्रुवारी रोजी आठवडी बाजारातील तसेच नियमित भरणाऱ्या बाजारांमधील अतिक्रमण काढण्याची विशेष मोहीम हाती घेण्याचे त्यांनी आदेश दिले. आदेशानंतर पहिल्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशी दहाही झोनअंतर्गत असलेल्या बाजारांमध्ये एकाचवेळी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आणि दिवसभरात अतिक्रमण हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले.

२२ बाजारांवर कारवाई
रविवारी दहाही झोनमधील एकूण २२ बाजारांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये खामला चौकातील मटन मार्केट, शामी लेआऊट, ऑरेंज स्ट्रीट लगतचा बाजार, रिंग रोड, शताब्दी चौक (बेलतरोडी रोड), कॉटन मार्केट नाका नं. १३, त्रिशरण चौक, मनीषनगर टी-प्वाईंट रेल्वे क्रॉसींग, संत्रा मार्केट, नटराज टॉकीज, अझमशहा चौक, सतरंजीपुरा चौक, बडकस चौक, पाचपावली, जागनाथ बुधवारी, झाडे चौक, कबीर नगर, पिली नदी, कामठी रोड, गोल बाजार, मंगळवारी बाजार, मंगळवारी झोनजवळील बाजार या बाजारांचा समावेश होता.

मंगळवारी झोनमध्ये नागरिकांचा घेराव
मंगळवारी झोनअंतर्गत शनिवारी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान जप्त केलेले सामान झोन कार्यालयाच्या प्रांगणात टाकण्यात आले होते. रविवारी कार्यालय बंद होते तरीही अतिक्रमणधारक दुकानदारांनी झोन कार्यालयाला घेराव केला आणि जप्त केलेले सामान पळवून नेले.