Published On : Wed, Sep 16th, 2020

आणखी ४० रुग्णालये ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ म्हणून घोषित

Advertisement

रुग्णहिताच्या दृष्टीने आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा महत्वपूर्ण निर्णय

नागपूर : शहरातील कोव्हिडबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी यापूर्वी ६२ खाजगी रुग्णालयांना ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये आता आणखी ४० रुग्णालयांची भर पडली आहे. म्हणजे आता शहरात एकूण १०२ खाजगी रुग्णालयांमध्ये कोव्हिडचे उपचार केले जाणार आहे. रुग्णहिताच्या दृष्टीने मनपाद्वारे हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहे.

शहरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये सुरूवातीला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जायचे. मात्र शहरातील वाढती स्थिती लक्षात घेता त्यानंतर काही खाजगी रुग्णालयांना कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र यानंतर शहरातील वाढते संक्रमण लक्षात घेता आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ही संख्या वाढवून ४० वर केली. शहरात अजूनही बेड्स अभावी अनेक रुग्णांचे हाल होत असल्याचे निदर्शनात येताच मंगळवारी (ता.१५) महापौर संदीप जोशी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिका-यांशी बैठक घेतली. या बैठकीत आणखी खाजगी रुग्णालये ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ म्हणून सुरू करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. त्यानुसार मनपा आयुक्तांनी बुधवारी (ता.१६) नव्‍या ४० रुग्णालयांसंदर्भात आदेश जारी केले.

शहरात यापूर्वी ६२ ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ घोषित करण्यात आले होते. यात आता नवीन ४० रुग्णालयांची भर पडली असून आता शहरात एकूण १०२ ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’ झाले आहेत. यापैकी ४० रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू असून इतरही रुग्णालयांमध्ये लवकरच उपचार सुरू केले जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली आहे.

सदर नवीन ४० ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’मध्ये येत्या ४८ तासांमध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण भरती करण्यात येतील. या रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता येणा-या बाधित रुग्णाला दाखल करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार सुरू करून रुग्णाचा रियल टाईम डाटा मनपाच्या पोर्टलवर नियमीत अद्ययावत करणे रुग्णालय प्रशासनाला अनिवार्य राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नवे ४० ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’
परफेक्ट हेल्थ सुपर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल धंतोली, न्यूक्लिअस मदर अँड चाईल्ड मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल, नेल्सन मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल सक्करदरा, श्रीकृष्ण हृदयालय अँड क्रिटीकल केअर सेंटर, डॉ.के.जी.देशपांडे मेमोरियल सेंटर फॉर ओपन हार्ट सर्जरी, मेडिकेअर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल उंटखाना रोड, सेंट्रल इंडिया कार्डीओलॉजी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, बोरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, तामसकर क्लिनीक रामदासपेठ, लोटस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अँड मॅटर्नीटी होम, सफल हॉस्पिटल काँग्रेस नगर, प्रेस्टिज हॉस्पिटल छावनी, जी.टी.पडोळे हॉस्पिटल, खलाटकर हॉस्पिटल रेशीमबाग, श्रावण हॉस्पिटल अँड किडनी इन्स्टिट्यूट, रहाटे सर्जीकल हॉस्पिटल, ग्रीन सिटी हॉस्पिटल अँड नर्सींग होम, मुखर्जी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, आरएनएच हॉस्पिटल प्रा.लि., आदित्य हॉस्पिटल क्रिटीकल केअर अँड इमर्जन्सी सेंटर, खोब्रागडे चाइल्ड ट्रस्ट हॉस्पिटल अँड इन्टेन्सिव्ह केअर इन्स्टिट्यूट, आरोग्यम सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, कलर्स चिल्ड्रेन हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटल शिवाजी नगर, तारांगण सर्जीकल हॉस्पिटल, सुपरलाईफ हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, एलिक्झिर मेट्रो सिटी हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअर, अभियोग स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंटर सेंटर अँड मॅटर्निटी होम, कुबडे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जेनक्यूअर हॉस्पिटल, एस.एस. मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, गार्सीयस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मेट्रो हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटल, आपुलकी वैरागडे हॉस्पिटल, शांती मोहन हॉस्पिटल, स्वस्तीक क्रिटीकल केअर, इंद्रायनी स्पेशॅलिटी हॉस्पिटल, ग्रेस हॉस्पिटल.