Published On : Thu, Jan 18th, 2018

राज्याचे पब्लिक क्लाऊड धोरण जाहीर

Advertisement

मुंबई: राज्याचे पब्लिक क्लाऊड धोरण तयार झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी शासनातील सर्व विभागांना प्राप्त झाली आहे. यामुळे सर्व विभागांना स्वतःचे डेटा सेंटर उभारुन त्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी आपल्या विभागातील कामांचा निपटारा करून योग्य परिणामांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे. तसेच क्लाऊड कंप्युटींग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी पहिल्यांदाच निर्माण झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि फिक्की (FICCI) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एम-टेक या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

एम टेक ही परिषद डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू ब्लॉक चेन या संकल्पनेवर आधारित आहे. या परिषदेला माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस आर व्ही श्रीनिवास, इस्टोनिया देशाचे राजदूत रिहो क्रूव्ह, डेलाईट कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार आणि कार्यकारी संचालक एन. वेंकट रामन, फिक्की या संस्थेचे अध्यक्ष रशेष शाह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पब्लिक क्लाऊड धोरण आता राबविण्यात येणार आहे. या धोरणामुळे ई-गव्हर्नस कार्य अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल. तसेच गुंतवणुकीसाठी नवे क्षेत्र खुले झाले आहे. शासनामार्फत विविध योजना राबवित असताना वेगवेगळ्या स्तरातील डेटा जमा केला जातो आणि वापरला जातो. पब्लिक क्लाऊड मुळे हा डेटा सर्व विभागांना एकत्रितपणे वापरता येणार आहे.

गेल्या तीन वर्षात शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. शासकीय कामकाजात पारदर्शकता, विश्वासार्हता आणण्यासाठी तसेच, लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविण्यात आला. गावा-गावांना डिजिटली जोडण्यासाठी फायबर नेट द्वारे महानेट हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावांमधील गैरसोयी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नविन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणारे बदल आपण अनुभवले आहेत. संज्ञापन क्रांती मुळे बदल घडलेले आपण बघितले आहेत. नव्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलाचे आपण आता साक्षीदार होणार आहोत. ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे विश्वासावर आधारित इंटरनेट आहे. जगात हे तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात वापरले जाते. क्रिप्टो करंसी याचे उदाहरण आहे. याच्या उपयोगाबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते. मात्र यातील त्रुटी दूर झाल्या आहेत. राज्य शासनामार्फत या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. या तंत्रज्ञानामुळे मधल्या अनेक यंत्रणा दूर होणार आहेत. पारदर्शक कारभाराला चालना मिळणार आहे. असे असले तरी हे अनियंत्रित असणार नाही. कारण कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापरावर संनियंत्रण असणे आवश्यक आहे.

इस्टोनिया देशाने या तंत्रज्ञानाचा वापर फार पूर्वी सुरु केला आहे. आज या परिषदेत त्यांनी सहभाग नोंदविला आहे, तसेच या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मार्गदर्शन करीत आहेत ही चांगली बाब आहे. या क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी स्टार्ट अप कंपन्यांनी पुढे यावे आणि या तंत्रज्ञानाच्या वापरात येणाऱ्या अडचणी दूर करण्या संदर्भात उपाय शोधावेत. या परिषदेत व्यक्त केलेल्या सूचनांवर राज्य शासन निश्चितच विचार करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना प्रधान सचिव श्री.श्रीनिवास यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, इंटरनेट म्हणजे माहिती तर ब्लॉक चेन म्हणजे व्यवहार असे थोडक्यात स्पष्टीकरण मांडता येईल. हे तंत्रज्ञान म्हणजे केवळ परिवर्तन नसून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील त्सुनामी ठरणार आहे. मुंबई हे तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रात अग्रेसर असणारी ‘फीन टेक’(Fin Tech) राजधानी ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे विश्वासू यंत्रणा उपलब्ध होणार आहे. यामुळे पारदर्शक आणि गतीमान कारभार शक्य होणार आहे. याद्वारे केवळ वित्तीय क्षेत्रच नव्हे तर जमीन अभिलेखापासून ते फिल्म म्युझिक पर्यंत सर्व कामांच्या सुसुत्रिकरणात याचा फायदा होणार आहे.

यावेळी इस्टोनिया देशाचे राजदूत रिहो क्रूव्ह यांनी त्यांच्या देशात ब्लॉक चेन तंत्रज्ञानामुळे झालेल्या अमुलाग्र बदलांविषयी माहिती दिली. गेल्या दहा वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा वापर होत असून भविष्यात हेच तंत्रज्ञान उपयोगी ठरणार असल्याने त्याचे महत्व विषद केले. इन्शुरन्‍स, इंटलिजन्स, माहिती प्रसारण, संरक्षण या क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा वापर करता येणे शक्य असल्याचेही क्रूव्ह यांनी सांगितले.

या परिषदेचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तर डेलाईट कंपनीने तयार केलेले नॉलेज रिपोर्ट या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.