Published On : Tue, Oct 30th, 2018

फडणविसांना रामाचा अवतार जाहीर करा; आपसूकच रामराज्य अवतरेल! विखे पाटील.

Radhakrishna Vikhe Patil

जालना: मागील ४ वर्ष महाराष्ट्रात ‘कुराज्य’ असताना राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य यात्रा’ काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही? नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ असे नाव दिले. ‘राम राज्य यात्रा’ म्हटले नाही. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून टाका. म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच‘राम राज्य’ अवतरेल, अशी बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत ते बोलत होते. राज्य सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुरू केलेल्या सुराज्य यात्रा काढली असून, हाच धागा धरून विखे पाटील यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, भाजपची सुराज्य यात्रा ४ दिवसात एकूण १३ जिल्ह्यात फिरणार आहे. म्हणजे एका दिवसात कमीत कमी तीन जिल्हे फिरणार. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत एका जिल्ह्याला एक दिवससुद्धा कमी पडतो आणि भाजप एका दिवसात तीन-तीन जिल्हे फिरायला निघाली आहे. आम्ही अनेक यात्रा पाहिल्या. पण अशी बुलेट ट्रेनसारखी वेगवान यात्रा अजून कधी पाहिली नव्हती. कदाचित ही यात्रा इतकी वेगात जाईल, की ती लोकांना दिसणारही नाही. अद्श्यच असल्यासारखी असेल. सरकारचे कामही अदृश्य अन् त्यांची यात्राही अदृश्य असेल. पुढील निवडणुकीत या सरकारलाच अदृश्य केले पाहिजे. अन्यथा पुढील काळात या देशातील शेतकरी अदृश्य झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्यांनी केला.

भाजप-शिवसेनेला १५ वर्षानंतर फक्त नशिबाने सत्ता मिळाली. पण यांची अवस्था ‘दैव देते, अन कर्म नेते’ सारखी झाली आहे. आज चार वर्षानंतर आपण काय केले, ते सांगण्यासारखे ठोस असे सरकारकडे काहीही नाही. या चार वर्षात सरकारने फक्त फक्त ‘इव्हेंट’, ‘स्टंट’ आणि जनतेच्या तिजोरीतील हजारो कोटी रूपये खर्च करून खोटी जाहिरातबाजी केली. वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया,एसटी, रेल्वे, पेट्रोल पंप, एटीएम मशीन अशी एकही जागा यांनी जाहिरातीतून सोडली नाही. फक्त सुलभ शौचालयाच्या आत भाजपच्या जाहिराती लागलेल्या नाहीत, हे नशीबच म्हणावे लागेल, असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

भाजप-शिवसेना शेतकऱ्यांप्रती दाखवत असलेला कळवळा खोटा आहे. तो १० टक्केही खरा असेल तर तातडीने दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, यंदाचा खरीप गेला असून, रब्बीसाठी जमिनीत ओल नसल्याने खरिप २०१८ मध्ये घेतलेल्या पीक कर्जासह शेतकऱ्यांचे सगळे कर्ज सरसकट माफ करा, अशी मागणी देखील विखे पाटील यांनी यावेळी केली.

भाजप-शिवसेनेच्या फसव्या सरकारविरूद्ध संपूर्ण देशात मोठी लढाई उभी झाली आहे. देशाची लोकशाही, संविधान, सर्वसामान्यांचे मुलभूत अधिकार धोक्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सरकारविरूद्ध देशपातळीवर संघर्ष उभा केला असून, नजीकच्या काळात भाजप-शिवसेनेचे अनेक खासदार-आमदार देखील काँग्रेसचा झेंडा घेऊन या लढाईत आमच्या खांद्याला खांदा लावून लढताना दिसतील, असे सूतोवाचही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.