Published On : Thu, Mar 29th, 2018

अखेर अण्णा हजारेंनी उपोषण सोडले

Advertisement


नवी दिल्ली: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच होते. अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीला पोचले. आज अण्णांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केला असे वृत्त आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाचा तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे.

गिरीश महाजन यांनी अनेकदा अण्णांची भेट घेऊन त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्राच अण्णांनी घेतला होता. तसेच उपोषणामुळे अण्णांचं वजन तब्बल साडे ५ किलोने घटले असून आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास १५ आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली आहे.

जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे.२३ मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती.