नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसकडूनही उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. मात्र अनेक नेत्यांना तिकीट न मिळाल्याने नाराजीनाट्य पहायला मिळत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिस अहमद हे देखील पक्षनेतृत्वावर नाराज असून काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.त्यांचे निकटवर्तीय आणि एमपीसीसीचे सरचिटणीस अतुल कोटेचा यांनी रमण पैगवार यांच्यासह पक्षाचा राजीनामा दिला आहे. यावरून अनिस अहमद हे देखील पक्षाला रामराम ठोकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वंचित बाहुजन आघाडीकडून लढणार निवडणूक ?
ज्येष्ठ नेते अनिस अहमद काँग्रेसचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून ते वंचित बहुजन आघडीकडून निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर त्यांना मध्या नागपुरातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काँग्रेसने मुस्लिमांना इग्नोर केले –
मुस्लिम समुदाय 99 टक्के काँग्रेसला मत देतो, मात्र काँग्रेस मुस्लिमांना त्यांचे हक्क देत नाही. लोकसभेत महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्या गेली नाही. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही काँग्रेसने मुस्लिमांना इग्नोर केले. त्यामुळे मुस्लिम समाज नाराज असून आता त्यांना त्यांचा हक्क हवाय. मुस्लिम मतदारांची ही बाब पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आम्ही सर्व आजी-माजी मुस्लिम नेत्यांनी सांगितली आहे, असे म्हणत अनिस अहमद यांनी नाराजी व्यक्त केली होती.