Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 18th, 2020

  पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची वळू संगोपन केंद्राला भेट

  नागपूर: पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी आज तेलंगखेडी येथील वळू संगोपन केंद्राला भेट ‍दिली. यावेळी पशुसंवर्धन सहआयुक्त के.एस.कुमरे, केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संजय ठाकरे उपस्थित होते. या केंद्राच्या प्रक्षेत्राच्या सभोवताली असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  त्यानंतर अमरावती रोडवरील अतिशीत रेत केंद्रालाही त्यांनी भेट दिली. यावेळी सरव्यस्थापक डॉ. रमेश भैसारे यांनी केंद्राच्या कार्याची माहिती दिली. अतिशीत केंद्रातील कृत्रीम रेतन केंद्रात असलेल्या प्रयोगशाळेचीही त्यांनी पाहणी केली. गीर, साहीवाल, जर्सी या जातीच्या वळुची पाहणी केली. रेत मात्रा उत्पादन 20 लाख युनिट करण्याचे निर्देश श्री. केदार यांनी दिलेत.

  ग्रामीण अर्थव्यवस्थेला मस्त्योत्पादनातून बळकटी देणार
  कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मरगळ आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांना पूरक आर्थिक उत्पन्नासाठी मस्त्योत्पादनावर लक्ष केंद्रीत करणार असून त्याला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बनविण्यासाठी मत्स्यसंवर्धन आणि मत्स्यशेतीला बळकट करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी आज सांगीतले.

  महारा्ष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) आज त्यांनी नागपूर मत्स्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू ए. एम. पातुरकर, अधिष्ठाता ए. पी. सोनकुवर, कुलसचिव चंद्रभान पराते यासह विदर्भ मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष लोणारे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

  कोविड-19 मुळे शहरी व ग्रामीण व्यवस्थेला मत्स्योत्पादनच चालना देऊ शकते. तसेच कोरोनासारख्या तत्सम विषाणुशी लढण्यासाठी मासे खाण्याने प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मत्स्य शेतीचा अंगीकार करुन उत्पादन वाढविले पाहीजे. त्यासाठी माफसूने संशोधनावर भर द्यावा.

  मासेमारीसाठी उत्तम मत्स्यबीज निर्मिती करावी. बारमाही विपूल पाणी असणा-या तलावांचा अभ्यास करुन तिथे मत्स्योत्पादन करावे यासंबंधीचा अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  प्रजननक्षम माशांचे व्यवस्थापन आणि गुणवत्तावाढ राबविण्यासाठी माफसूने टास्क फोर्स तयार करुन वर्षभरात अहवाल देण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. फिरत्या मत्स्य विक्री संच निर्मीतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रायोगिक तत्वावर हे संच उपलब्ध करुन देण्यात येतील.

  कौशल्य विकास व उदयोजकता अभियानामध्ये मत्स्य संवर्धन विषयाचा समावेश करुन प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145