नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून भाजपमध्ये निर्माण झालेल्या बंडखोरीला अखेर वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रा. अनिल सोले यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोले यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. तसेच भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या निर्णयामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. प्रा. अनिल सोले यांनी या निर्णयाला विरोध करत निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे नागपूर भाजपमध्ये बंडखोरीचे आव्हान उभे राहिले होते.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल सोले यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सोले यांनी निवडणुकीतून माघार घेत सुधाकर कोहळे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधातील बंडखोरीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अनिल सोले यांच्या भूमिकेला पाठिंबा देत माजी आमदार गिरीश व्यास यांनीही नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. आता सोले यांच्या माघारीनंतर गिरीश व्यासदेखील आपला राजीनामा मागे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चेनंतर नागपूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष मिटविण्याच्या दिशेने महत्त्वाची घडामोड घडली आहे. आता गिरीश व्यास यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



