Published On : Wed, Nov 20th, 2019

पोलिस मित्राच्या मदतीने वाहन तपासणे आले अंगलट

Advertisement

इंदोरा पो. उपनि. बकाल यांची तड़काफड़की बदली

नागपूर : वाहनचालकांची कागदपत्रे तपासणीसाठी चक्क पोलिस मित्राची मदत घेऊन कर्तव्य बजावण्यात हलगर्जी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकांची बुधवारी बदली करण्यात आली आहे. बकाल असे संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून ते इंदोरा पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता शेखर कोलते यांनी सदर घटनेची ऑडियो-व्हिडिओ क्लिप बनवून ती इंदोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, पोलिस आयुक्त, पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस महासंचालकांकडे पाठविली होती. संबंधित पोलिस अधिकाऱ्यानी कोलते यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बकाल यांची तडकाफडकी बदली केली. माहितीप्रमाणे, कोलते ८ नोव्हेंबर रोजी सकाळी कोराडीमार्गे नागपुरला जात होते.

दरम्यान नागपूर हायवेच्या गोधनी-बोकारा चेकिंग पोस्टवर एक इसम खाकी पँट आणि अंगात रंगीत शर्ट घातलेला असून तो वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे कोलते यांना आढळले. त्याच्याजवळ चालान रक्कम भरण्याची एटीएम स्वॅप मशीन आणि पावतीची मशीनसुद्धा होती.

कोलते यांना ही बाब खटकली. त्यांनी याविषयी त्या व्यक्तीला विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. सोबचत नाव, पद आणि कर्तव्यावर असताना वर्दी न घालण्याचे कारण सांगण्यासही नकार दिला. कोलते यांनी घटनेचा त्या अनधिकृत कर्मचाऱ्याचे व्हिडिओ चित्रिकरण केले असता त्याने कोलतेंना मोबाइल बंद करण्याची ताकीद देत घटना स्थळावरून पळ काढला. आश्चर्य म्हणजे त्याचवेळी पोलिसांचे कर्तव्यावर असलेले पथक चेकिंग पॉईंट सोडून चहा टपरीच्या आडोश्याला बसलेले आढळले. यातील पोलिस उपनिरीक्षक अरुण बकाल यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी कोलते यांचीच विचारपूस करून त्यांना माहिती देणे टाळले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर कोलते यांनी इंदोरा पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक खुशाल तिजारे यांना फोन करून बकाल यांच्या कार्यशैलीविषयी माहिती दिली. दरम्यान ते पोलिस मित्राच्या मदतीने वाहनचालकांची कागदपत्रे तपासत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर कोलते यांनी बकाल यांच्या विरोधात पोलिस विभागाकडे रीतसर तक्रार केल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. कर्तव्यावर असताना कसूर बाळगणाऱ्या बकाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी कोलते यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकड़े लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची कोलते यांनी सांगितले.