नागपूर : रॅपिडोची राइड कॅन्सल केल्याच्या रागातून ऑटोचालकाने 36 वर्षीय महिलेला कथितरित्या अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याची घटना नागपुरातील प्रतापनगर परिसरात समोर आली आहे. पिकअप पॉइंटवरून झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला. महिलेच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी रॅपिडो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख साहिल चौधरी अशी झाली आहे. संबंधित महिलेने 19 सप्टेंबर रोजी रॅपिडो अॅपवरून ऑटो बुक केला होता. बुकिंगनंतर चालक एमएच-49-सीएफ-0377 क्रमांकाचा ऑटो घेऊन आला. मात्र, चालक महिलेने सांगितलेल्या पिकअप पॉइंटवर न जाता दुसऱ्याच ठिकाणी पोहोचल्याचा आरोप आहे.
यावरून महिला आणि चालकामध्ये फोनवरून वाद झाला. त्यानंतर महिलेने राइड कॅन्सल केली. राइड कॅन्सल होताच चालकाचा पारा चढला आणि त्याने रॅपिडोच्या इन-अॅप कम्युनिकेशनच्या माध्यमातून महिलेला कथितरित्या अश्लील व आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
या प्रकारामुळे महिला घाबरली आणि तिने प्रतापनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 आणि 352 तसेच इतर लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून महिला आणि चालकातील संभाषण, अॅपवरील मेसेज तसेच इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रतापनगर पोलीस करीत आहेत.





