मुंबई : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्याकांडांत वाल्मिकी कराड हे मुख्य आरोपी असल्याचा आरोप करण्यात येत होता .
आज पुण्यात कराड याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. त्याने पुण्यात सीआयडीत आत्मसमर्पण केले. वाल्मिकी कराड शरण आल्यानंतरही विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
मृतक संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला, हे सीआयडीचं यश नसून, आम्ही सरकारवर जो दबाव टाकला त्यातून वाल्मिकी कराडवर मानसिक दबाव आला आणि तो शरण आला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 22 दिवस वाल्मिकी कराड हा महाराष्ट्रात बिनधास्तपणे फिरत होता. त्याने अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतलं. तो पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल झाला. काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मिकी कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे, असा घणाघात संभाजीराजे यांनी केला.