Published On : Thu, Apr 29th, 2021

…आणि ५.३० लाखाचे बिल झाले अडीच लाख

Advertisement

वाढीव रुग्ण बिलासंदर्भात माजी महापौर संदीप जोशी आक्रमक : पीडितांनी समोर येण्याचे केले आवाहन

नागपूर : कोरोना रुग्णांची लुबाडणूक होऊ नये यासाठी शासनाचे कडक नियम आणि दिशानिर्देश असताना नागपुरात मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असल्याचे लक्षात येताच माजी महापौर संदीप जोशी यांनी या संदर्भात तक्रार करण्याचे आवाहन केले. या आवाहना नंतर अनेकपीडितांनी त्यांच्याशी संपर्क केला. एका तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ५ लाख३० हजार रुपयांचे बिल चक्क अडीच लाखावर आले.

असे अनेक रुग्णांसोबत घडत असून ज्यांना ज्यांना रुग्णालयांनी वाढीव रक्कमेचे बिल दिले आहे अशी शंका असेल त्यांनी आपल्या चमुशी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

त्यानी केलेल्या आवाहनानंतर आज अनेकांनी वाढीव बिलासंदर्भात माहिती दिली. कृतिका सोमेश दिपानी या चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना रुग्णालयाने चार दिवसाचे ५ लाख ३० हजार रुपये बिल दिले होते. माजी महापौर संदीप जोशी यांच्या आवाहनानंतर कृतिका यांच्या पतीने त्यांच्याशी संपर्क साधला. संदीप जोशी यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. बिलाची शहानिशा स्वतः केली. यात रुग्णाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संपर्क साधला. दिपानी यांच्या बिला संदर्भात त्यांच्याकडे जाब मागितला. माजी महापौर संदीप जोशी यांचा पवित्रा बघून व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली. बिलामध्ये दुरुस्ती करून ५.३० लाखाचे बिल अडीच लाखांचे करून दिले. कमी झालेल्या बिला नंतर संबंधित रुग्ण आणि कुटुंबियांना दिलासा मिळाला असून त्यांनी संदीप जोशी यांचे आभार मानले.

शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही, ८० टक्के शासकीय दराने आणि २० टक्के व्यवस्थापनाच्या दराने खासगी रुग्णालयात नियोजन होत नसल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला आहे. महानगरपालिकेने प्रत्येक रुग्णालयात बिलांचे अंकेक्षन करण्यासाठी अंकेक्षकांची नियुक्ती केली असूनही खासगी रुग्णालय त्यांना जुमानत नसल्याचे संदीप जोशी यांनी म्हटले आहे. आज दिवसभरात ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या पुढील कार्यवाहीसाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. त्याचाही नियमित पाठपुरावा करून रुग्णांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अनेक रुग्णालये रुग्ण सेवेचे कार्य उत्तमरित्या करीत आहेत. मात्र जे रुग्णालय मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करेल त्यांना धडा शिकवू, असा इशाराही माजी महापौर संदीप जोशी यांनी दिला.
नागरिकांच्या बिलासंदर्भात तक्रारी जाणून घेण्यासाठी स्वतः संदीप जोशी हे मनपा मुख्यालयातील सत्तापक्ष कार्यालयात शासकीय सुट्ट्या वगळता दररोज दुपारी ४ वाजता बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या क्रमांकावर करा तक्रारी

आनंद-9822204677
अमेय-9561098052
शौनक-7447786105
मनमित-7744018785