नागपूर – शहरातील जरीपटका पोलीस ठाणे क्षेत्रातील खोब्रागडे चौकात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा डीपी (डिस्ट्रिब्युशन पॅनल)ला करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार तड़के सुमारे ४ वाजता जरीपटका पोलिसांचे गस्त पथक गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की खोब्रागडे चौकातील एका इलेक्ट्रिक पोलच्या डीपीवर एक व्यक्ती चिकटलेला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले असता संबंधित व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत डीपीला चिकटलेला होता. पोलिसांनी तातडीने त्याला खाली उतरवून मेयो रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अंदाजे वय ४० ते ५० वर्षे दरम्यान असावे, असे सांगितले जात आहे. मृत व्यक्तीने आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाचा लोअर परिधान केला होता. तसेच त्याचे केस व दाढी काळे व पांढऱ्या रंगाचे मिश्रित होते.
दरम्यान, जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक खुटवड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.