नागपूर : नवी दिल्ली येथील कुख्यात गुंड शिजो चंद्रार नाडर याने पुन्हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केला. याआधी त्याने फेब्रुवारी महिन्यात जेलमधील हॉस्पिटलमध्ये गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिजो हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गोळीबार, अपहरण, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का ) गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली असून त्याला नागपूर कारागृहात ठेवण्यात आले आहे. बुधवारी दुपारी त्याने आपल्या मनगटावर धारदार वस्तूने वार केले.
तसेच कारागृह कर्मचाऱ्यांना पोलीस प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. धंतोली पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शिजो नाडारविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान शिजोने 2012 मध्ये हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामना परिसरात बस थांबवली होती आणि पाचपाओली येथील रहिवासी असलेल्या त्याच्या मैत्रिणीवर गोळीबार केला होता.
हिंगणा पोलिसांनी त्याला आंध्र प्रदेशातील मेहबूब नगर येथून अटक केली होती. तुरुंगात असताना त्याला 2019 मध्ये क्षयरोग झाल्याचे निदान झाले. 7 जुलै 2019 रोजी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या टीबी वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 20 जुलै 2019 रोजी सकाळी तो शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून वॉर्डातून पळून गेला. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक करून कारागृहात पाठवले.