अकोला: अकोल्यात सतर्क आरपीएफ कॉन्स्टेबलने जेष्ठ प्रवाशाचे प्राण वाचवल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी ट्रेन क्रमांक 12135 पुणे-नागपूर एक्स्प्रेस अकोला स्थानकावरून निघाली. यादरम्यान चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असलेला एक ज्येष्ठ प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील दरीमध्ये पडला.
विनोद जटाळे (आरपीएफ कर्मचारी, भुसावळ विभाग, मध्य रेल्वे) जे अकोला स्थानकावर कर्तव्यावर होते, त्यांनी प्रवाशी रेल्वेतून पडताना पाहिले. सतर्कता आणि धाडसाचे उदाहरण देत त्यांनी तात्काळ धावत प्रवाशाला पकडून प्लॅटफॉर्मवर ओढले आणि प्रवाशाचे प्राण वाचवले.
बाळकृष्ण इंगळे (60, अकोला) असे या प्रवाशाचे नाव आहे. आपले प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी विनोद आणि भारतीय रेल्वेचे आभार मानले.
एका प्रवाशाचे प्राण वाचवून सतर्कता, धाडसाचे अनोखे उदाहरण घालून देणारे विनोद जटाळे यांना ‘जीवनरक्षक’ म्हणता येईल. या धाडसी कृत्याने विनोद यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे