Published On : Tue, Aug 16th, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा

Advertisement

राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण
रस्ते सुरक्षा रॅलीला केले रवाना
जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन
राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.१५) विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रगीत सादर केले गेले व राज्यपालांसह उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, सशस्त्र सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी, शासनाचे अधिकारी, नागरिक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांशी संवाद साधला व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ध्वजवंदन सोहळ्यानंतर राज्यपालांनी रस्ते सुरक्षा या विषयावर जनजागृती करणाऱ्यासाठी आयोजित मोटर सायकल रॅलीला झेंडा दाखवून रवाना केले. मोटार सायकल रॅलीचे आयोजन शेखर नायडू मेमोरियल फाउंडेशन या संस्थेने केले होते.

यावेळी श्री प्रयागधाम ट्रस्ट पुणे या संस्थेच्या विश्वस्तांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीसाठी आपल्या योगदानाचा धनादेश राज्यपालांकडे सोपवला.

राज्यपालांची राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट; हुतात्म्यांना अभिवादन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घोरपडी, पुणे येथील सशस्त्र सैन्य दलाच्या दक्षिण कमांडच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना राज्यपालांनी यावेळी अभिवादन केले.

यावेळी सशस्त्र सैन्य दलाच्या दक्षिण कमांडचे लष्करी अधिकारी व जवान उपस्थित होते. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक पुणे येथील नागरिकांच्या योगदानातून उभारले आहे.

राज्यपालांची हीरक महोत्सव साजरा करणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेला भेट; स्मरणिकेचे प्रकाशन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत आपल्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सवी स्मरणिकेचे अनावरण केले.

यानिमित्त पोस्ट विभागातर्फे प्रकाशित हीरक महोत्सव विशेष आवरण व पोस्टेज स्टॅम्पचे देखील राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद व पोस्टाच्या पुणे विभागाचे मुख्य टपाल अधिकारी रामचंद्र जायभाये हे उपस्थित होते.