Published On : Tue, Jan 30th, 2018

अमृत पाणीपुरवठा योजना आता मजिप्रा करणार

Advertisement

File Pic

नागपूर: नागपुरात महानगर पालिकेमार्फत राबवण्यात येणारी केंद्रपुरस्कृत अटल अमृत पाणीपुरवठा योजना आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबवण्याचा निर्णय पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कक्षात मंत्रालयात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शहराजवळील अधिकृत-अनधिकृत वस्त्यांसाठी, झोपडपट्टयांना पाणीपुरवठा करण्यासाठी 2016 मध्ये ही योजना आली. शहरातील सहाही विधानसभा मतदार संघात येणाऱ्या वस्त्यांना या योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येणार होता. पण योजनेच्या कामाच्या निविदा काढण्यात 2 वर्ष मनपाने घालविल्यामुळे अखेर ही योजना आता मजिप्राकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

या योजनेच्या कामाचा मूळ प्रस्ताव महानगरपालिकेने 283 कोटींचा तयार केला होता. मात्र मजिप्राने 226 कोटींचा प्रस्तावाला मान्यता दिली. मनपाने 2016 पासून आतापर्यंत 6 वेळा निविदा काढल्या. पण मूळ प्रकल्पापेक्षा 35-40 टक्के ज्यादा दराच्या निविदा आल्या, कंत्राटदाराच्या साखळीत या योजनेच्या कामाच्या निविदा मनपाकडे योग्य दरात आल्या नाही. परिणामी मनपाला या योजनेचे काम करता आले नाही.

मनपाने काढलेल्या निविदांमध्ये आलेल्या दराची तुलना मजिप्राच्या सध्याच्या दराशी केली असता मजिप्राच्या दरानुसार मनपाच्या निविदाची किंमत अधिक आली. या अधिक किमतीच्या निविदादराला शासनाची मान्यता मिळाली नाही. 2015 च्या दरानुसार 227 कोटी रूपयांचे प्राकलन असलेली ही योजना मंजूर आहे. केवळ 30-40 टक्के ज्यादा दराची निविदा असल्यामुळे ही योजना लांबली. आणि शहरातील पाणीपुरवठयाचे जाळे नसलेल्या भागाला पाणी मिळू शकले नाही.

महापालिकेकडून ही योजना होत नाही हे लक्षात घेऊन 227 कोटीत दीड वर्षात अमृत योजना पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी दिले. मजिप्राने नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजना 2 वर्षात पूर्ण केली. नुकतेच या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. पण अमृत योजना मात्र कंत्राटदारांच्या साखळीत अडकली. परिणामी मजिप्रानेच ही योजना करावी असा निर्णय पालकमंत्री बावनकुळे व आमदारांच्या उपस्थितीत घेण्यात आला. मजिप्राने युध्दपातळीवर योजनेसाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया करावी व काम सुरू करावे. मनापाने या योजनेसंदर्भात सर्व कागदपत्रे महराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सुपूर्द करण्याचे निर्देशही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी दिले.

पाईपलाइनसाठी 30 कोटी
पेरी अर्बनमधील पाणीपूरवठा योजनेच्या अतिरिक्त पाईपलाईनसाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी 30 कोटींना मान्यता दिली. पालकमंत्री बावनकुळे यांनी केलेल्या मागणीवरून हा निधी मंजूर करण्यात आला. 103 किमी पाईप लाईनचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही याप्रसंगी देण्यात आले. पेरी अर्बन योजनेतील बचत झालेल्या निधीतून हे काम करण्यात येत आहे. बीडगाव व तरोडी या दोन गावांचा समावेशही पेरीअर्बनमध्ये करण्यात आला.