Published On : Mon, Dec 27th, 2021

‘आम्रपाली’ ने दिला शांतीचा संदेश

Advertisement

– खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा सहावा दिवस

नागपूर: अन्‍याय, अत्‍याचार, युद्धासारख्‍या विनाशक कृतींनी समाजाला सर्वनाशाच्‍या खाईत ढकलण्‍यापेक्षा भगवान गौतम बुद्धाने दाखवलेला शांतीचा मार्ग समाजहिताचा आहे, असा संदेश हिंदी महानाट्य ‘जन कल्‍याणी आम्रपाली’ ने दिला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या सहाव्‍या दिवशी म्‍हणजे बुधवारी ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाच्‍या पटांगणावर सुरू असलेल्‍या खासदार नागपूरच्‍या कलाकारांचे भव्‍य असे ‘आम्रपाली’ महानाट्य सादर करण्‍यात आले. 450 हून अधिक मुख्‍य व सहकारांचा सहभाग असलेल्‍या महानाट्यामधील नृत्‍य कला, तलवारबाजी आणि फटाक्‍यांच्‍या आतषबाजीने नागपूरकरांच्‍या डोळ्यांचे पारणे फेडले. नाटकाचे लेखक प्रेम कुमार उके होते तर दिग्‍दर्शक हर्ष कुमार यादव होते.

कांचनताई गडकरी व इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलनाने सहाव्‍या दिवसाच्‍या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार नाना शामकुळे, अॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. चंदशेखर मेश्राम, डॉ. पुरणचंद्र मेश्राम, प्रा. संजय दुधे, समाजकल्‍याण उपायुक्‍त सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्‍त समाजकल्‍याण बाबासाहेब देशमुख, धर्मपाल मेश्राम, संदीप जाधव व नाटकाचे लेखक प्रेम कुमार उके इत्‍यादी मान्‍यवरांचे स्‍वागत करण्‍यात आले.

बुद्धकालिन इतिहासात अनेक व्‍यक्‍ती धर्माचा प्रचारात गुंतलेल्‍या होत्‍या. त्‍यात काही महिलादेखील आघाडीवर होत्‍या. त्‍यामधील एक विशेष महिला होती आम्रपाली. आम्रपालीचा जन्‍म वैशालीनगरातील मातंगी देवीच्या पोटी झाला. पित्‍याने तिला स्‍वीकारण्‍यास नकार दिल्‍यामुळे जंगलातील आंब्‍याच्‍या झाडाखाली तिला सोडून दिले जाते. गावातील एका व्‍यक्‍तीला ती सापडते. आंब्याचा झाडाखाली सापडली म्‍हणून तिचे नाव आम्रपाली ठेवले जाते. नृत्‍य, कला आणि युद्ध कौशल आत्‍मसात करत आम्रपाली मोठी होते. आम्रपालीच्‍या सौंदर्याने मोहित होऊन वैशालीचा सम्राट तिला नगरवधूचा दर्जा देतो आणि ती गृहयुद्ध टाळण्‍यासाठी राष्‍ट्राच्‍या सेवेत देहदान करते. सम्राट बिंबिसार पहिल्‍या भेटीतच तिच्‍या प्रेमात पडतो.

तिला लग्‍नाची मागणी घालतो. नगरवधू असल्‍यामुळे ती नकार देते. पण नंतर बिंबिसार तिच्‍या विनवण्‍या करतो आणि दोघे विवाहबद्ध होतात. राजा, महाराज आणि लोकांना तिच्‍या विवाहाची बातमी कळताच, तीव्र संतापाने तिला मारण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. अखेर ती भगवान बुद्धाला शरण जाते आणि बुद्ध धम्‍माचा प्रचार करू लागते. भगवान बुद्धाच्‍या विचारांनी प्रभावित होऊन तिला मारायला आलेले सर्व लोक त्‍यांच्‍यासमोर नतमस्‍तक होतात आणि शांतीचा मार्ग स्‍वीकारतात. आजच्‍या स्थितीत आपल्‍या युद्ध नको तर बुद्ध पाहिजे असा संदेश हे नाटक देते.

या महानाट्यात भगवान बुद्धाची भूमिका लखन पडवार, सम्राट बिंबिसारची भूमिका कुणाल मिश्रा आणि आम्रपालीची भूमिका लाजरी काळे यांनी साकारली. नागपुरातील संयोनी मिश्रा अश्विन वाघाले, सुभाष लखन, विपिन दुबे, नितीन सुपटकर, हर्षाली काईलकार, रचिता चिलबुले यांच्‍यासह इतर कलाकारांचाही सहभाग होता.

नाटकाचे सहदिग्‍दर्शक आयुष तिवारी व शक्‍ती रतन होते तर नेपथ्‍य सतीश काळबांडे व प्रकाशयोजना किशोत बत्‍तासे यांनी सांभाळली. नृत्‍य दिग्‍दर्शन समीर पाटील व सह दिग्‍दर्शन जयश्री खेडकर यांचे होते.

खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, हाजी अब्‍दुल कादिर यांचे कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी सहकार्य लाभत आहे. संदीप गवई यांनी प्रास्‍ताविक केले तर सूत्रसंचालन रेणुका देशकर यांच्‍यासह मयुरेश गोखले व मृण्‍मयी कुळकर्णी यांनी केले.

भगवान बुद्धाच्‍या आगमनाने रसिक भारावले
मंचासमोर असलेल्‍या प्रेक्षागारातून शाक्‍यमुनी भगवान बुद्ध आणि त्‍यांच्‍या अनुयायांचे आगमन होताच आकाशात फटाक्‍यांची आतषबाजी झाली. वैशाली नगरीतील भगवान बुद्धांचा प्रवेश नृत्‍य, संगीताने साजरा करण्‍यात आला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्‍या कडकडाटात भगवान बुद्धांचे स्‍वागत केले. त्‍यानंतर सजवलेल्‍या रथातून मगध सम्राटाचे आगमनही महानाट्याचा आकर्षण बिंदू ठरले.

आज महोत्‍सवात
डॉ. सय्यद पाशा व चमूचा ‘सांस्‍कृतिका उत्‍सव’. स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्‍त खास तयार करण्‍यात आलेल्‍या या कार्यक्रमात दिव्‍यांग कलाकार ‘डान्‍स ऑन व्‍हील्‍स’ च्‍या माध्‍यमातून देशभ‍क्‍तीचा जागर करतील.