मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीत लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्यांचं शिवसेनेनं आज खंडन केलं. ‘या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. पण त्यात कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. शिवसेनेला विचलित करण्यासाठीच अशा बातम्या पेरल्या जात असून त्यामुळे शिवसेना विचलित होणार नाही,’ असं शिवसेनेने आज स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यासाठी शिवसेनेला केंद्रात दोन आणि राज्यात ३ मंत्रिपदं देण्याचा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला असून शहा-ठाकरे यांच्या बैठकीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा फॉर्म्युलाही ठरवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ‘युतीच्या बातम्या पेरल्या जात असून या बातम्या पेरण्याची शेती सध्या कोण करत आहे, हे सर्वांनाच माहित आहे,’ असा टोला लगावतानाच केवळ गोंधळ आणि संभ्रम निर्माण करण्यासाठीच अशा बातम्या पेरल्या जात असून त्याने शिवसेना विचलित होणार नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. फॉर्म्युला ठरवायचा तर आम्ही आमचा ठरवू. आम्ही सक्षम आहोत. कुणाच्या फॉर्म्युल्याचं ताट येण्याची वाट पाहणार नसल्याचं सांगतानाच केंद्रातील टीडीपीच्या वाट्याचं रिक्त असलेलं मंत्रिपद घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही ते म्हणाले.
‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्यांनीच २०१४ मध्ये युती तोडली. ‘ऑल वेल’ बिघडवणारेच सध्या दोन्ही पक्षात ऑल इज वेल असल्याचं म्हणत आहेत,’ अशी टीका करतानाच सध्या देशात हवापालट सुरू असून ही खांदेपालटाची सुरुवात असल्याचं ते म्हणाले. देशातील ५ ते ७ मोठ्या पक्षांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटण्यास उत्सुक आहेत. उद्धव ठाकरे त्यांना भेटण्याची वेळ देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
