नागपूरअंबाझरी परिसरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वराज्य गणेशोत्सव मंडळाच्या ‘नवसाला पावणारा अंबाझरीचा मोरया २०२६’ यांचा भव्य आगमन सोहळा शनिवारी सायंकाळी लक्ष्मी भवन चौक येथे उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात झालेल्या आगमनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
आगमन सोहळ्यादरम्यान ढोल-ताशा पथकाच्या दणदणाटात भाविक आणि युवकांनी मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष फटाक्यांच्या आतषबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रंगीबेरंगी आतषबाजीने लक्ष्मी भवन चौकाचा परिसर उजळून निघाला.
या सोहळ्यास स्वराज्य गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज सपकाळ यांच्यासह पदाधिकारी रोहन चरडे, सूरज वानखेडे, श्रेयश कुंभलकर, जनक मालविया, मंथन बावने, ओमकार गोतमारे, विश्वराज सपकाळ आणि सौम्य देशमुख उपस्थित होते.
आगमन सोहळ्यानंतर सीसी टर्फच्या बाजूला, अंबाझरी हिल टॉप, नागपूर येथे गणरायाची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. आगामी गणेशोत्सवादरम्यान मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.




