Published On : Wed, Oct 7th, 2020

सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर

Advertisement

भंडारा : देश आणि जग कोरोनासारख्या गंभीर समस्येशी झुंजत असताना भंडारा जिल्ह्यात महापूर आला. त्यामध्ये लाखांदूर तालुक्याला त्याचा मोठया प्रमाणात फटका बसला. बऱ्याच लोकांचे घराचे, विविध वस्तूंचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे तात्काळ केले गेले होते आणि शासनाने 43 कोटी रुपयांचा निधी महापुरात झालेल्या नुकसानीसाठी भंडारा जिल्ह्यासाठी दिलेला आहे. लवकरच तो वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, राज्य शासन आपल्यासोबत आहे आणि मी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपल्या पाठीशी कायम आहे असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले. लाखांदूर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली, याप्रसंगी ते बोलत होते.

लाखांदूर तालुक्यामध्ये राष्ट्रीयकृत बँक पाहिजे अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती, त्या मागणीचा पाठपुरावा केला गेला आणि आज आपण बँक ऑफ महाराष्ट्रच्या लाखांदूर शाखेचे उद्घाटन देखील करत आहोत असे विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले. त्यांच्या हस्ते बँकेच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. बँक ही सर्वसामान्य लोकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था असून लोकोपयोगी कार्य जास्तीत जास्त प्रमाणात कसं करता येईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे कार्य निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करेल, असा मला विश्वास वाटतो असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलत असताना महाराष्ट्र शासनाची “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही जी मोहीम आहे ती आपण प्रत्येकाने पार पाडली पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंब प्रमुखाने जर आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेतली तर या रोगापासून जास्त झळ आपल्याला बसणार नाही, कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येक कुटुंब प्रमुखाने आपल्या घरच्या कुटुंबातील लोकांना कुठलीही कोविड-19 ची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि तपासणी करण्यास घाबरू नये कारण आपण हा रोग असा आहे की आज जेवढा उशीर करू तेवढा तो त्रासदायक आणि जीवघेणा ठरेल, त्यामुळे एक जबाबदार कुटुंब प्रमुख या नात्याने कुठलीही कोविड-19 शी संबंधित लक्षणे दिसल्यास न घाबरता तात्काळ तपासणी करून घ्यावी आणि त्यासंदर्भात उपचार घ्यावे.

या रोगतुन आपण निश्चित बरे होतो, मी देखील यातून बरा झालेलो आहे मात्र काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे कुणीही घाबरू नये आणि लक्षणे लपवू नये तसेच अत्यंत महत्त्वाची त्रिसूत्री म्हणजे शारीरिक अंतराचा नियम पाळणे, वारंवार आपले हात स्वच्छ करणे आणि अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क न चुकता वापरणे. या सगळ्या गोष्टी जर आपण नियमितपणे पाळल्या तर कोविड-19 पासून आपण निश्चितच दूर राहू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यादरम्यान त्यांच्यासोबत आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.