Published On : Wed, Jul 5th, 2017

राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेवून खरीप पीक कर्ज वाटप करा – सचिन कुर्वे

  • 391 कोटी 14 लाख खरीप कर्ज वाटप पूर्ण
  • कर्जमाफी योजनेअंतर्गत मंडळस्तरावर कर्ज मेळावा
  • सातबारा कोरा करुन तेथेच नवीन कर्ज

Sachin Kurve
नागपूर: शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यकतेनुसार कर्जवाटप करताना राष्ट्रीयकृत बँकांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी शेतकरी सभासदांना सहज व सूलभपणे कर्ज वाटप करावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे सातबारा कोरा करण्यासोबतच कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मंडळस्तरावर विशेष शिबीर आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकऱ्यांना खरीप कर्ज वाटपासंदर्भात विविध बँकेच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक शशीराज, महाराष्ट्र बँकेचे विजय कांबळे, जिल्हा सहनिबंधक एस.एल. भोसेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अयुब खान आदी यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना खरीप पीक हंगामासाठी 830 कोटी 99 लक्ष रुपयाचा पतआराखडा मंजूर करण्यात आला होता. जिल्हयातील 36 हजार 152 शेतकरी सभासदांना 391 कोटी 14 लक्ष रुपयाचे खरीप पीक कर्ज वितरीत करण्यात आले असून जिल्हयात खरीप पीककर्ज वाटपाचे 47 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पीक कर्ज वाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेवून 15 जुलैपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे अशी सूचनाही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी दिली.

Advertisement

राष्ट्रीयकृत बँकांनी 70 टक्केपेक्षा जास्त कर्ज वाटप केलेल्या बँकांपैकी अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, विजया बँक, तसेच बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदिंनी चांगले काम केले असून इतर बँकांनीही दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकरी सभासदनिहाय यादी तयार करुन त्यांना कर्ज पुरवठा कण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना देतांना जिल्हयाला दिलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

बँक ऑफ इंडियातर्फे गावांचा क्रेडीट प्लॉन तयार केला असून त्यानुसार कर्ज वाटप करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्याचप्रमाणे इतर बँकांनीही 15 जुलैपर्यंत दिलेले उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज पुरवठा कसा करता येईल यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

तालुका व मंडळस्तरावर कर्जमाफी अंमलबजावणी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ देण्यासाठी तालुका व मंडळस्तरावर विशेष शिबीर आयोजित करण्यात येईल. या शिबीरामध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे दिनांक 6 जून 2016 रोजी थकीत असलेले मुद्दल व व्याजासह दीड लाख मर्यादेपर्यंतचे कर्जमाफ होणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच नवीन कर्ज मंजूर करण्यासाठी महसूल व बँकांची यंत्रणा एकत्र ही योजना राबवेल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

कर्जमाफी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकरी सभासदांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना करताना अशा पात्र सभासदांना नवीन कर्ज संदर्भात या शिबीरामध्ये लाभ मिळू शकेल, या दृष्टीने नियोजन करावे. तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्याचे स्वतंत्र यादी तयार करावी. कर्जमाफी योजनेअंतर्गत दिलेल्या निकषाप्रमाणे विविध स्तरावर मिळणारे लाभ मंडळस्तरावर दिल्यास शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी लाभ देणे सूलभ होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा सहनिबंधक श्री. भोसले यांनी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात यावेळी माहिती दिली. तसेच जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. अयुब खान यांनी जिल्हयातील विविध बँकांना खरीप पीक कर्जासाठी दिलेले उद्दिष्टानुसार प्रत्यक्ष कर्ज वाटपासंदर्भातील माहिती दिली. यावेळी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement