Published On : Thu, Sep 5th, 2019

हुडकेश्वर नरसाळातील 13 कामांना मंजुरी वैयक्तिक नळ कनेक्शन देणे सुरु

Advertisement

नागपूर: हुडकेश्वर नरसाळा या भागातील 13 विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असून या कामांच्या निविदा प्रक्रियाही झाल्या आहेत. एका आठवड्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यादेश देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत मनपात झालेल्या बैठकीत अधिकार्‍यांनी दिली.

या बैठकीला पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे, नगरसेवक भगवान मेंढे, स्वाती आखतकर, विद्या मडावी उपस्थित होते. या पैकी 5 कामे मनपा स्थायी समितीकडे आहेत. श्री कॉलनी महालक्ष्मीनगर, कडूनगर या भागातील रस्ता रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण. तसेच दुबेनगर येथे सिमेंट रस्ता. दुबेनगर पातरे यांच्या घरापासून ठाकरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता. प्रभाग 29 श्यामनगर, आम्रपालीनगर, पवारनगर, उचकेलवार लेआऊट या भागातील रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग 29 मध्ये सोळंकी लेआऊट येथे खडीकरण, प्रभाग 29 कडूनगर वैद्य लेआऊट या भागात खडीकरण करून रस्ता बनवणे, या संपूर्ण भागात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहे.

सीताबर्डी ते न्यू नरसाळा ते गांधीबाग या बसचे वेळापत्रक देण्यात यावे व वेळापत्रकाचे फलक लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच न्यू नरसाळा येथून सकाळी 7 ते रात्री 9.30वाजेपर्यंत बससेवा सुरु करण्याची मागणी पाहता पालकमंत्र्यांनी बससेवा सुरू करण्यास मनपाला सांगितले.

हुडकेश्वर नरसाळा या भागात पाणीपुरवठ्यासाठी वैयक्तिक कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. हे काम 1 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा करणारी यंत्रणा उपलब्ध आहे, तेथे कनेक्शन द्यावे.