Published On : Sat, Apr 18th, 2020

गठई कामगार आणि नाभिक समाजाची आर्थिक कुचंबणा : बावनकुळे

शासनाने समाजाला आर्थिक मदत द्यावी

नागपूर: लॉक डाऊनच्या काळात संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यावसायिकांचे व्यवसाय बंद आहेत. गठई कामगार व नाभिक समाजाच्या व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत. परिणामी त्यांची आर्थिक कुचंबणा होत असल्याने शासनाने या दोन्ही समाजाला आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात बावनकुळे म्हणतात- व्यवसाय बंद असल्याने गठई कामगार आणि सलून व्यावसायिकांची उपासमार होत आहे. गठई कामगारांना 3 हजार रुपये प्रतिमाह आर्थिक सहाय्य 3 महिनेपर्यंत, गठई कामगारांचा उद्योग पूर्ववत सुरू करण्याकरिता 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान, गठई कामगारांना हेल्थ किटचे वाटप, तसेच 3 महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे.


तसेच नाभिक समाजाच्या व्यावसायिकांचीही उपासमार होत आहे. संचारबंदीमुळे सलूनची दुकाने बंद आहेत. गेल्या दीड महिन्यापासून त्यांचा व्यवसाय ठप्प पडून आहे. या व्यासायिकांनाही 3 हजार रुपये प्रतिमाह 3 महिन्यासाठी अनुदान देण्यात यावे, दुकान भाड्यासाठी 25 हजार रुपये एकरकमी अनुदान, 3 महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे, अशा मागण्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहे.