Published On : Sat, Jun 16th, 2018

बुलढाणा बातम्या : ​शेतकऱ्यांचे जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

​​बुलढाणा: शेतकऱ्यांच्या जीवावर रोजच कुठल्या न कुठल्या समस्येची लटकती तलवार असते. ज्यामुळे त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. १९९८ साली बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यात शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या होत्या. वर्षे उलटली पण जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकर्यांनीं सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.

न्यायालयाने २०१४ मध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत तात्काळ मोबदला देण्याचा आदेश प्रशासनाकडे केला होता. मात्र तेव्हापासून प्रशासनाने कुठलीही हालचाल न केल्याने व सातत्याने निवेदन देऊनही कुठलाही फायदा होत नसल्याने वैतागलेल्या जानेफळ ग्रामस्थानांनी आमरण उपोषणास सुरुवात केली.

आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाचा एकही अधिकारी या शेतकऱ्यांकडे भटकला सुद्धा नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वयोवृद्ध शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु असल्याने दिवसभऱ्यात असंख्य शहरवासी उपोषण मंडपाला भेटी देत आहेत.