
नागपूर : नागपूरच्या एम्समध्ये निवासी डॉक्टरासोबत गैरवर्तन, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. २२ सप्टेंबर रोजी MICUमध्ये कर्तव्य बजावत असताना रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा दावा रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने केला आहे.
या प्रकरणात खासदाराच्या नावाचा वापर करून दबाव आणण्यात आल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे. संबंधित खासदारांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच राजकीय शिफारशीवरून रुग्णांना विशेष सुविधा किंवा बेड देण्याची पद्धत बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीडित डॉक्टरच्या वैयक्तिक नावाने दाखल करण्यात आलेला गुन्हा संस्थात्मक FIRमध्ये बदलण्यात यावा. हल्ल्याच्या आरोपींना २४ तासांत अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवरही निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागप्रमुखांनी पीडित डॉक्टरची योग्य विचारपूस न करता त्यांना पुन्हा कामावर बोलावल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणी प्रशासनाने स्पष्टीकरण देऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ‘कोड व्हायलेट’, २४ तास रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि आपत्कालीन अलार्म यंत्रणा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास नियमित OPD, IPD आणि नियोजित शस्त्रक्रिया सेवा बंद ठेवण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन आणि ICU सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.




