
नागपूर – नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा विचार करताना कधीही जात, धर्म किंवा पक्षीय राजकारण आड येऊ दिले नाही. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचे कल्याण हाच केंद्रबिंदू ठेवून विकासकामे केली. नागपूरची जनता हीच आमची कुटुंब आहे, या भावनेतूनच निर्णय घेतले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले.
मंगळवारी (दि. १३ जानेवारी) बांगलादेश येथील नाईक तलाव चौकात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २०, ८ आणि २२ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आमदार प्रविण दटके, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार विकास कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले की, नागपूरच्या विकासाची पहिली ‘फिल्म’ जनतेने पाहिली असून, दुसरी ‘फिल्म’ लवकरच पाहायला मिळणार आहे. शहरात अनेक नवे विकास प्रकल्प सुरू होणार असून, नागपूरचा चेहरामोहरा आणखी बदलणार आहे.
नाईक तलाव परिसरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. तलावाच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन झाले, रेल्वे फाटकाचा प्रश्न सुटला, रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाली. मुंबई–कोलकाता रेल्वेलाईनवरील अंडरपासचा प्रश्नही निकाली काढण्यात आला. हलबा समाजाच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देण्यात आले. या सर्व कामांमागे सामान्य जनतेच्या अडचणी सोडविणे हाच उद्देश होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
कमाल टॉकीज चौकातून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन ३० मार्चपूर्वी होणार असल्याची माहिती देताना ना. गडकरी म्हणाले की, या पुलामुळे अवघ्या १२ मिनिटांत ताजबागच्या पुढे पोहोचता येणार असून, वाहतुकीची मोठी कोंडी सुटणार आहे. वर्धा रोड, कामठी रोड आणि पारडी येथे उभारण्यात आलेल्या बहुस्तरीय उड्डाणपुलांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो पूल असे आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.
गरीब माणसासाठी स्वतःचे घर असणे फार महत्त्वाचे आहे. बांगलादेश परिसरात नागरिकांना हक्काचे घर मिळाले असून आतापर्यंत ७०० घरांच्या नोंदण्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे गोरगरीब जनतेला सुरक्षित निवाऱ्याचा अधिकार मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील हातमाग साड्यांचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी धापेवाडा येथे विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत उभी राहणार असून, तेथे हातमागावरील साड्यांचे उत्पादन होईल, अशी माहिती ना. गडकरी यांनी दिली.








