Published On : Tue, Nov 5th, 2019

अखिल भारतीय हास्य व्यंग कवी संमेलनात श्रोत्यांना रिझवले

– नागपूर महानगरपालिकेचे आयोजन : देशातील प्रसिद्ध कवींच्या रचनांनी मंत्रमुग्ध

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय हास्य व्‍यंग कवि संमेलनात श्रोत्यांना चांगलेच रिझवले. देशाच्या विविध भागातून आलेल्या नामवंत कवींच्या अप्रतिम रचनांनी नागपूरकरांना मंत्रमुग्ध केले.

रविवारी (ता.३) सरदार वल्लभभाई पटेल मैदान, कच्छी विसा परिसर लकडगंज येथे आयोजित संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार गिरीश व्यास, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, अखिल भारतीय हास्य व्यंग कवि संमेलनाचे संयोजक व मनपातील सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, नगरसेविका सरिता कावरे, नगरसेविका मनिषा धावडे, नगरसेविका चेतना टांक, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय हास्य व्यंग कवि संमेलनात दिल्ली येथील पद्‌मश्री डॉ. सुनील जोगी (हास्य-व्यंग रस), जयपूर येथील जनाब अब्दुल गफ्फार (ओज रस), निंबाहेडा राजस्थान येथील शांती तूफान (हास्य रस), दिल्ली येथील डॉ. श्रीमती कीर्ती काळे (श्रृंगाररस, गीत-गजल), प्रतापगड येथील शैलेंद ‘शैलू’ (हास्य-व्यंग पैरॉडिकार), उज्जैन येथील हिमांशु ‘बवंडर’ शर्मा (हास्य-व्यंग रस) यांनी सहभाग घेतला. नागपूर येथील प्रख्यात मंच संचालक आणि कवि डॉ. महेश तिवारी यांनी मंच संचालन केले.

यावेळी बोलताना आमदार गिरीश व्यास म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे मागील चार वर्षापासून कवि संमेलनाचे आयोजन केले जात आहे. नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारीच्या समाधानासह कवि संमेलनासारख्या माध्यमातून समाजिक प्रबोधन केले जात आहे, ही स्तुत्य बाब असून अशा आयोजनाबद्दल कवि संमेलनाचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचेही त्यांनी अभिनंदन केले. देशातील प्रसिद्ध हास्य कवि डॉ. सुनील जोगी यांना शासनातर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला तेव्‍हा डॉ. जोगी नागपुरातच एका कार्यक्रमात सादरीकरण करीत होते व त्यांच्या पद्मश्री पुरस्काराची पहिली घोषणा ही नागपुरातूनच झाल्याची आठवणही आमदार गिरीश व्यास यांनी यावेळी सांगितली.

प्रास्ताविकात नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आयोजनामागची भूमिका विषद केली. प्रभागामध्ये विकास कामे करने हे नगरसेवक म्हणून प्रथम कर्तव्य आहे. मात्र यासोबतच आपल्या प्रभागात क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेउन येथील सांस्कृतिक चळवळीला वाव मिळवून देणेही आवश्यक आहे. याच भावनेतून दरवर्षी कवि संमेलन, बॉडी बिल्डींग, दही हंडी, गुणवंत विद्यार्थी सत्कार असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

चुटकुले, टाळ्या, देशभक्ती आणि ‘भारत माता की जय’चे नारे

अखिल भारतीय हास्य व्‍यंग कवि संमेलनात देशाच्या विविध भागातून आलेल्या कवींनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाने संपूर्ण मैदानात उत्साह संचारला.

नागपुरी संतरे की तरह सतरंगी हो जाना,

इस दुनिया में टेंशन लेकर मत अटेंशन में जीना

क्योंकी जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है

कुछ लोगों को देखकर लगता है कि वो जबरदस्ती जिंदा है I

मंचावर येताच हास्य व्यंग कवि उज्जैन येथील हिमांशु ‘बवंडर’ शर्मा यांनी आपल्या पहिल्याच सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर हास्य व्यंग पॅरॉडिकार प्रतापगड येथील शैलेंद ‘शैलू’ यांनी चित्रपटांच्या गीतांच्या चालीवर सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांना ताल धरायला लावला. जयपूर येथील जनाब अब्दुल गफ्फार यांच्या ओज रसच्या कवितांनी वातावरणात देशभक्तीचा जोश निर्माण केला.

बेशक हम भी मुसलमान है, पर ऐलान हमारा है

हिंद मादरे वतन हमारा, हमें जान से प्यारा है

मक्का और मदिने के जज्बे हममें भी रहते है

हममें भी वो वली मुस्तबा बनकर धडकन बहते है

जंग का शंख बजा तो मंजर यही होगा

हिंदु से पहले सरहद पर हर मुसलमान का सर होगा

अशा अनेक जोशपूर्ण कवितांनीच्या दमदार सादरीकरणाने जनाब अब्दुल गफ्फार यांनी वातावरण देशक्तीपर करून घेतले. प्रारंभी सरस्वती वंदना सादर करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करणा-या दिल्ली येथील डॉ. श्रीमती कीर्ती काळे पुन्हा मंचावर आल्या आणि त्यांनी आपल्या श्रृंगारसरातील कविता, गीत, गजलने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मागील वर्षीच्या हास्य व्‍यंग कवि संमेलनात आपल्या कवितांची छाप सोडणारे निंबाहेडा राजस्थान येथील शांती तूफान दुस-यांदा नागपुरातील मंचावर येताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. हास्य रसातील त्यांच्या कवितांनी आणि चुटकुल्यांनी उपस्थितांना लोटपोट केले. कार्यक्रमात सर्वांना उत्सुकता लागलेले पद्मश्री दिल्ली येथील डॉ. सुनील जोगी मंचावर येताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. बहारदार आणि सुप्रसिद्ध रचनांसह नवको-या रचनाही सादर करुन डॉ. जोगी यांनी उपस्थितांच्या मनावर छाप सोडली व उपस्थितांनीही आपल्या टाळ्यांच्या माध्यमातून चांगलीच दाद दिली. लकडगंज येथील कच्छी विसा परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मैदान रविवारी (ता.३) कवींचे चुटकुले, कविता, त्यावरच्या टाळ्या आणि ‘भारत माता की जय’च्या ना-यांनी दुमदुमुन गेले होतो.

गुरूदास राउत व रौनक साधवानी यांचा सत्कार

नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धीबळ चॅम्पियनशीपमध्ये नेत्रदिपक कामगिरी करून शहराचा गौरव वाढविणारा व नागपुरातील पहिला ग्रँड मास्टर ठरलेला रौनक साधवानी आणि दिव्यांग विश्व चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करुन रौप्य पदकाची कमाई करणारा गुरूदास राउत यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय हास्य व्यंग कवि संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी केले. यावेळी क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.