▪️जिल्हादंडाधिकारी यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया केल्या रद्द
▪️कोणत्याही कार्यक्रमासाठी ड्रोनची परवानगी घेणे आवश्यक
▪️भारत-पाकीस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्कतेचा आदेश
▪️नियोजन भवन येथे सर्व विभागप्रमुखांकडून सतर्कतेचा घेतला आढावा
नागपूर,दि. 10 : भारत-पाकीस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष राहावे. विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही क्षणी आवश्यकता भासेल तिथे उपस्थित राहण्याच्या दृष्टीने मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या असून प्रशासकीय पातळीवर आवश्यकत्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनातर्फे ज्या काही सूचना केल्या जातील त्याचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून काटेकोरपालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
नियोजन भवन येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली खबरदारीच्या उपाययोजनेसाठी नागपूर जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांची व्यापक आढावा बैठक संपन्न झाली. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे संचालक डॉ. हरी ओम गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व बी. वैष्णवी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उप वनसंरक्षक भारतसिह हाडा, राष्ट्रीय अग्नी सेवा महासंचालनालयाचे माजी संचालक राजेश चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व आस्थापनांचे सुरक्षा अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आरोग्याच्या सुविधा तत्पर ठेवा
या तणावाच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणांनी आपल्या जवळ असलेल्या सर्व सुविधा प्रत्यक्ष खातरजमा करुन तत्पर ठेवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. विशेषत: आपात कालीन परिस्थितीत आव्हाने निर्माण झालीत तर यासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे हॉस्पिटलमधील बेड/कॉटची व्यवस्था, स्टेचरची सुस्थिती, सुरक्षा यंत्रणा याबाबी तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आवश्यकता भासेल तेवढे रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी नागपुरकरांमध्ये अधिक सकारात्मकता व सतर्कता आहे. यादृष्टीने काही ठिकाणी रक्तदान शिबीरे घेण्याचे निर्देश डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
खोट्या अफवा पसरविल्यास कठोर दंडात्मक कारवाई
– पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल
नागपुरच्या सामाजिक स्वास्थ्याला व एकात्मतेला बाधा पोहचविणारे जर कोणी सोशल मिडीयाद्वारे संदेश पाठवित असेल अथवा खोट्या अफवा पसरवत असेल तर अशा व्यक्तींविरुध्द पोलीसांतर्फे कठोर कारवाई जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिला. आपण एका युध्दजन्य तणावाच्या स्थितीतून जात आहोत याचे भान नागपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आहे. तथापी काही वयोगट अथवा युवक आपल्या गैरवर्तणूकीतून सार्वजनिक ठिकाणी अथवा कुठेही जर कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचवत असतील तर अशा गटांवर पोलीसांतर्फे कठोर कारवाई करु, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
नागरिकांकडून आपल्या वाहनाच्या पार्किंगपासून स्वत:ही दक्ष असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
होमगार्ड यंत्रणेला सर्व सुविधांसाठी तत्पर राहण्याच्या सूचना
लोककल्याणासाठी, शांततेसाठी, समाजातील सौहार्दपणा टिकवून सुरक्षिततेची काळजी घेत स्वत:ला तत्पर ठेवणे हे कोणत्याही जागृत नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. यादृष्टीने नागरिकांच्या सतर्कतेबरोबर जिल्हा प्रशासनासह, पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा सोबतीला आहे. होमगार्ड यंत्रणेवर सुरक्षिततेसह आवश्यकता भासेल त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधेपासून सर्वत्र तत्पर राहण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
संयम आवश्यक
जागृत समाज व्यवस्थेत अधिक संयम हा प्रत्ययास येत असतो. नागरिकांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन वेळोवेळी विविध प्रकारची माहिती प्रसारित केली जाते. याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाचे हे अधिकृत व्हिडीओज, आपतकालीन परिस्थितीत काय करावे, काय करु नये ही सारी माहिती समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. विविध माध्यमांनी याबाबत अधिकाधिक जागरुकता घेत चुकीची माहिती जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली.
सर्व यंत्रणा सतर्क
नागरिकांच्या आवश्यक असलेल्या सेवा सुविधा सुस्थितीत राहव्या यादृष्टीने महानगर पालिका, नगरपरिषदा,नगरपंचायती, पंचायत समिती यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. पाणी पुरवठ्यापासून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे, आपल्या अखत्यारित असलेली सार्वजनिक रुग्णालय तत्पर ठेवणे, जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेणे, कुठेही अराजकता होऊ नये यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपसी सहकार्याच्या भावनेतून अधिक जबाबदार प्रशासनाचा प्रत्यय दिला पाहिजे. यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
डिझेल, पेट्रोल, गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध; चिंतेचे कारण नाही
कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याला डिझेल व पेट्रोलची कमतरता भासणार नाही असे नियोजन शासनाने करुन ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. नेहमीप्रमाणे आपल्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार लागेल तेवढेच पेट्रोल/डिझेल घेण्याच्या सूचना या बैठकीद्वारे करण्यात आल्या.